तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
neeraj-waghmare : यवतमाळ नगर परिषद येथील बांधकाम विभाग, नियोजन विभाग, आरोग्य विभाग, विद्युत विभाग तसेच पाणीपुरवठा विभागाकडे नगरसेवक तथा गटनेते नीरज वाघमारे यांनी विविध जनहिताच्या विषयांबाबत माहिती मागविली होती. नगरसेवक म्हणून प्रशासनाकडे कोणत्याही विषयाची माहिती मागविण्याचा कायदेशीर व प्रशासकीय अधिकार असतानाही संबंधित विभाग प्रमुखांकडून वारंवार टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे.
मागितलेल्या माहितीबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही संबंधित विभागांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याने मंगळवार, 23 जून रोजी सकाळी 11 वाजता नीरज वाघमारे यांनी संबंधित विभागप्रमुखांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक मीरा वीर उपस्थित होत्या. त्यांनीही प्रशासनाने लोकप्रतिनिधींना आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी व पारदर्शक कारभाराला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली.
यावेळी बोलताना वाघमारे म्हणाले, नगरसेवक हा नागरिकांचा प्रतिनिधी असून जनहिताच्या कामांवर देखरेख ठेवणे, प्रशासनाकडून माहिती घेणे व नागरिकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणे ही त्यांची जबाबदारी आहे. नप प्रशासनातील विविध विभागांकडून आवश्यक माहिती वेळेवर उपलब्ध न झाल्यास लोकप्रतिनिधींना आपली कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडणे कठीण होते.
नप प्रशासनाने माहिती देण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, लोकप्रतिनिधींना सहकार्य करावे व मागितलेली माहिती तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नीरज वाघमारे यांनी केली. नागरिकांच्या हिताशी संबंधित विषयांवर माहिती मिळविण्यासाठी व पारदर्शक प्रशासनासाठी आपला लढा सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.