आता मातोश्रीचे ‘नाथ’ बनणार एकनाथ?

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
New Shiv Sena Bhavan to be built महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून मुंबईत स्वतंत्र आणि भव्य ‘शिवसेना भवन’ उभारण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे. पक्षाच्या नव्या मुख्यालयासाठी मुंबईतील काही महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील एक जागा आणि दादर येथील दुसरी जागा विचाराधीन असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, बीकेसी परिसरातील जागा मातोश्रीजवळ असल्याने या हालचालींना अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
 

New Shiv Sena Bhavan to be built 
 
नव्या ‘शिवसेना भवन’साठी दादरलाप्राधान्य
2022 मधील बंडानंतर शिंदे गटाने राज्यभरात आपले संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाल्याने पक्षाची ताकद वाढल्याचे मानले जात आहे. या वाढत्या संघटनात्मक विस्तारामुळे आता पक्षाला स्वतंत्र आणि प्रतीकात्मक मुख्यालयाची गरज भासत असल्याचे बोलले जात आहे.मात्र, नव्या ‘शिवसेना भवन’साठी बीकेसीपेक्षा दादरला अधिक प्राधान्य दिले जात असल्याचेही समोर आले आहे. मराठी अस्मिता आणि शिवसेनेच्या पारंपरिक विचारसरणीशी दादरचा जवळचा संबंध असल्यामुळे दादर हा पर्याय अधिक योग्य मानला जात आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून दादरला पक्षाच्या राजकीय प्रवासात विशेष स्थान राहिले आहे.
 
सध्या पक्षांतर्गत या विषयावर चर्चा सुरू असून अंतिम ठिकाण निश्चित करण्यासाठी विविध बाबींची तपासणी केली जात आहे. जर मुंबईत, विशेषतः दादरसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या भागात शिंदे सेनेचे स्वतंत्र मुख्यालय उभे राहिले, तर शिवसेनेच्या ओळख आणि वारशाच्या लढाईला आणखी धार मिळण्याची शक्यता आहे. मुंबई ही शिवसेना राजकारणाचे केंद्र मानली जाते. त्यामुळे नवे मुख्यालय उभारण्याचा हा निर्णय केवळ संघटनात्मक नसून राजकीयदृष्ट्याही मोठा संदेश देणारा ठरू शकतो.