नंदुरबारमध्ये मुलींच्या वसतिगृहात विषकांड!

22 विद्यार्थिनींना विष देण्याच्या कटाचा आरोप

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
नंदुरबार,
Poisoning incident in hostel in Nandurbar नंदुरबार शहरातील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वसतिगृहात राहणाऱ्या 22 विद्यार्थिनींच्या अन्नात आणि पिण्याच्या पाण्यात विष मिसळण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे.या प्रकरणाला गंभीर वळण तेव्हा मिळाले, जेव्हा दोन महिला कर्मचाऱ्यांमधील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये विद्यार्थिनींच्या अन्नात आणि पाण्यात विष मिसळण्याबाबत चर्चा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली.
 
 
Nandurbar
 
घटनेची माहिती समोर येताच विद्यार्थिनींसह विविध विद्यार्थी संघटनांनी संताप व्यक्त केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि वसतिगृहातील विद्यार्थिनींनी वसतिगृहाबाहेर आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे वसतिगृह प्रशासनाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
 
 
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा आता ऐरणीवर आला असून पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातच असा प्रकार घडत असेल, तर विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दोषी महिला कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये पुरावे स्पष्ट दिसत असतानाही प्रशासन कारवाई करण्यास उशीर का करत आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दोषींना तात्काळ अटक न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थी परिषदेकडून देण्यात आला आहे.