गोंदिया,
priti tembhare राज्यातील शेती, फलोत्पादन आणि कृषी संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या शेतकरी, महिला शेतकरी, युवा शेतकरी, कृषी संस्थांसह कृषी अधिकार्यांना दिले जाणारे 2023 चे विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कार महाराष्ट्र शासनाने 19 जून 2026 रोजी जाहीर केले आहेत. यात गोंदिया जिल्ह्यातील प्रगत महिला शेतकरी प्रीती टेंभरे यांना मानाचा जिजामाता कृषीभूषण 2023 पुरस्कार जाहीर झाला आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. यात प्रीती टेंभरे यांच्यासह विविध विभागांतील शेतकरी, व्यक्ती, संस्था आणि गटांची निवड कली आहे. राज्य शासनाकडून वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, उद्यानपंडित, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (सर्वसाधारण व आदिवासी गट), तसेच पद्यश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार अशा विविध पुरस्कारांद्वारे निवड झालेल्या मानकर्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यात नागपूर विभागातून प्रीती टेंभरे यांना सदर पुरस्कार जाहीर झाला आहे. टेंभरे ह्या गोंदिया शहरालगत असलेल्या चूटीया येथील रहिवासी असून मागील अनेक वर्षांपासून आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत. बी.एससी बीएड शिक्षण घेतलेल्या प्रीती यांचे बालपण नागपूर सारख्या शहरात गेले. लग्न होऊन सासरी आल्यानंतर नोकरीचा त्याग करून त्यांनी गायीच्या शेणापासून राखी बनविणे, गायीच्या शेणापासून दिवाळीचे दिवे तयार करणे यासह दैनंदिन उपयोगाच्या अनेक वस्तू देशी गायींच्या शेणापासून तयार करून अनेक शेतीपूरक लघुउद्योग साकारून अनेक महिलाना रोजगार उपलब्ध करून दिले आहे.priti tembhare गीर गायींच्या संगोपनासह फळबाग शेतीमध्ये त्यांनी लक्षणीय कामगिरी केली आहे. गीर गायींच्या शेणापासून खत व गोमूत्र पासून फवारणी करून सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यावर त्यांचा भर आहे. यामुळे शेती व पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य शासनाच्या वतीने त्यांची जिजामाता कृषिभूषण 2023 या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.