नागपूर,
Rain arrives in Vidarbha नागपूरसह संपूर्ण विदर्भात अखेर मान्सूनचे आगमन झाले असून, अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला थंड वातावरणाची अनुभूती मिळू लागली असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार यंदा विदर्भात मान्सून सुमारे 10 दिवस उशिराने दाखल झाला आहे. सध्या गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावली असून पुढील दोन ते तीन दिवसांत उर्वरित विदर्भ व्यापण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर, भंडारा आणि गोंदिया या भागातही लवकरच जोरदार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, हवामान विभागाने शेतकऱ्यांना पेरणीबाबत अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. मान्सून दाखल झाला असला तरी सुरुवातीच्या काळात पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 28 जूननंतर मान्सूनचा दुसरा टप्पा सक्रिय होण्याचा अंदाज असून, शेतात किमान 70 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. अन्यथा दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
दुसरीकडे, नाशिक शहर आणि परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे कमाल तापमानात घट होऊन वातावरण आल्हाददायक झाले आहे. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून घाटमाथा भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून नागरिकही समाधान व्यक्त करत आहेत. राज्यातील एकूण परिस्थिती पाहता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील मोठा भाग तसेच मुंबई आणि पुणे परिसरात मान्सून सक्रिय झाला आहे. पुढील काही दिवस पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता असून पूर्व आणि पश्चिम विदर्भातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.