विद्यार्थ्यांचे भविष्य अडकले मान्यतेच्या फाईलमध्ये

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
नागपूर,
nagpur university नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा’ या एम.ए. अभ्यासक्रमाला २०१५ पासून सुरुवात झाली असली, तरी अद्याप त्याला विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) मान्यता मिळालेली नाही. ११ वर्षे उलटूनही मान्यता प्रलंबित असल्याने या अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक भवितव्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीगुरूदेव युवामंचाने या विषयावर आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांनी सांगितले आहे की, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पीएच.डी. प्रवेशासाठी अर्ज केल्यावर “ही पदवी यूजीसी मान्यताप्राप्त नाही” असे कारण देत नोंदणी नाकारण्यात येते. तसेच नेट-सेट परीक्षा, सहाय्यक प्राध्यापक भरती आणि शासकीय नोकरी प्रक्रियेतही ही पदवी ग्राह्य धरली जात नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
 
nagpur university
 
यासंदर्भात अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी विद्यापीठ प्रशासन, माजी कुलगुरू तसेच विद्यमान कुलगुरू यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून “तांत्रिक अडचणी आहेत, प्रयत्न सुरू आहेत” असेच उत्तर मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, विद्यापीठात ‘महात्मा गांधी विचारधारा’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा’ हे अभ्यासक्रम यूजीसी मान्यताप्राप्त असून त्यांना शैक्षणिक लाभ मिळतो. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारेबाबत दुजाभाव होत असल्याचा आरोपही युवामंचाने केला आहे.
 
या पार्श्वभूमीवर २८ जून रोजी विद्यापीठात होणाऱ्या पद्मश्री सत्कार समारंभाच्या निमित्ताने श्रीगुरूदेव युवामंचाने भूमिका स्पष्ट केली आहे. या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कारप्राप्त जनार्दनजी बोथे यांचा सत्कार होणार आहे. मात्र, जोपर्यंत अभ्यासक्रमाला यूजीसी मान्यता मिळत नाही, तोपर्यंत हा सत्कार स्वीकारू नये, अशी मागणी युवामंचाने केली आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून मात्र अद्याप यावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. ११ वर्षांपासून प्रलंबित असलेला हा मुद्दा कधी मार्गी लागणार, याकडे विद्यार्थी आणि समाजाचे लक्ष लागले आहे.
सौजन्य: ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र