मुंबई,
Relief for 'Lalpari' employees राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत ही घोषणा करत एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून थेट ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आल्याचे सांगितले. यासोबतच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली असून कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीच्या दरातही सुधारणा करण्यात आली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत सरनाईक यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत लाखो प्रवाशांना जोडून ठेवण्यात एसटीची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.घरभाडे भत्त्यातही मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी असलेला ८, १६ आणि २४ टक्के दर वाढवून तो आता १०, २० आणि ३० टक्के करण्यात आला आहे. तसेच वार्षिक वेतनवाढीचा दर २ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यात आला आहे. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीची थकबाकी मिळून सुमारे ५,६४९ कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.