केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Resignation of George Kurian केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या घडामोडींना वेग आला असून केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मत्स्यव्यवसाय आणि अल्पसंख्याक व्यवहार विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कुरियन यांच्या राजीनाम्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे.या घडामोडीनंतर केंद्र सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल होणार का, याबाबतच्या चर्चांना जोर आला आहे. राजकीय वर्तुळात या निर्णयाचे विविध अर्थ लावले जात असून पुढील काही दिवसांत आणखी बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
मंत्री जॉर्ज कुरियन
 
कुरियन यांचा संसदीय कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची पुन्हा निवड न झाल्याने ते संसदेत कोणत्याही सभागृहाचे सदस्य राहिले नव्हते. अशा परिस्थितीत मंत्रीपद कायम ठेवणे शक्य नसल्याने त्यांनी पदत्याग केल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात त्यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात कुरियन यांचा मंत्रिमंडळात समावेश अनेकांसाठी आश्चर्यकारक मानला गेला होता. विशेषतः केरळच्या राजकारणात भाजपची पकड मजबूत करण्याच्या रणनीतीचा हा भाग मानला जात होता.
 
 
केरळमध्ये ख्रिश्चन मतदारांचा प्रभाव लक्षात घेता कुरियन यांची नियुक्ती राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली गेली होती. भाजपला राज्यात सामाजिक आणि राजकीय विस्तार साधण्यासाठी या निर्णयाचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून जॉर्ज कुरियन यांचा दीर्घ अनुभव राहिला आहे. पक्ष संघटनात अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर त्यांनी केंद्रातही महत्त्वाच्या भूमिका निभावल्या. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता मोदी सरकार पुढे कोणते राजकीय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.