चंद्रपूर,
safari vehicles in tadoba ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या सफारीसाठी डिझेलवर चालणार्या गाड्या वापरल्या जातात. या गाड्यांमुळे वायू व ध्वनी प्रदूषण होते. शिवाय इंधनाचा प्रश्न असतोच. त्यामुळे येत्या काळात येथील सफारीच्या सर्व गाड्या ‘ईव्ही’मध्ये बदलण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.
सोमवारी दुपारी नितीन गडकरी सहपरिवार ताडोबा येथे जंगल सफारीसाठी आले होते. त्यांचा हा खाजगी दौरा होता. मंगळवार, 23 जून रोजी सकाळी त्यांनी देवाडी गेटवरून सफारी केली. अगदी काही अंतरावरच ताडोबातील ‘छोटा दडीयल’ नामक रूबाबदार वाघाचे त्यांना दर्शन झाले. ताडोबा प्रकल्पाचा मोहर्ली गेट अत्यंत देखणा केल्याबद्दल त्यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे कौतुकही केले.
सफारी पूर्ण केल्यानंतर गडकरी यांनी काही पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, सध्या जल, वायू व ध्वनी प्रदुषण या सगळ्यात महत्वाच्या समस्या आहेत. विशेषतः जंगलात डिझेलवर चालणार्या गाड्या वापरल्यामुळे हवेचे प्रदुषण होते. सोबतच या गाड्यांच्या आवाजामुळे ध्वनी प्रदुषण आहेच. या गाड्यांऐवजी समोर दोन आणि मागे सहा अशा 8 लोकांची व्यवस्था असलेल्या, मजबूत चेसीस असलेल्या ‘इलेक्ट्रीक बॅटरी’चालणार्या गाड्या वापरता येईल. या गाड्या जेथे ‘पार्क’ केल्या जातील तेथेच छत करून, त्यावर सोलार पॅनल लावायचे आणि गाडीची बॅटरी चार्ज करून घ्यायची. नंतर साधारण: तिनशे-साडे तीनशे किलोमीटर ती गाडी चालवता येईल. असे केल्याने ‘फ्यूल कॉस्ट‘ जवळपास शून्य होईल. शिवाय आवाज होणार नाही आणि वायू प्रदूषणही होणार नाही. महत्त्वाचे म्हणजे. सफारी स्वस्त होईल आणि नफाही वाढेल.safari vehicles in tadoba येथील 300 लोकांकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे. अशा सर्वांसाठी ही योजना तयार करण्याच्या सूचना मी कालच चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत तसेच वनाधिकार्यांना दिल्या आहेत. ही योजना वीज मंडळाकडून आपण मंजूर करून घेऊ. त्याला बँकेचे लोन मिळवून देवू. या नव्या गाड्यासाठीचा काही खर्च चालक करेल. काही येथील ट्रस्टच्या मार्फत करता येईल का, याचा विचारही विचार करण्याबाबत सूचवले आहे, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.