समुद्रपूर,
sameer-kunawar : मुंबई येथे सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिंगणघाट मतदार संघाचे आ. समीर कुणावार यांची तालिका अध्यक्षपदी निवड केली आहे. आ. कुणावार यांना ही जबाबदारी पाचव्यांदा सोपवण्यात आली आहे. या निवडीमुळे वर्धा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
वर्धेचे तत्कालीन दिवंगत आ. प्रमोद शेंडे यांना विधानसभा उपाध्यक्ष म्हणून विधान मंडळाचे कामकाज करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर विधानसभा तालिका अध्यक्ष हा बहुमान आ. कुणावार यांना मिळाला. पहिल्यांदा नागपूर अधिवेशनात विदर्भातील उदयोन्मुख नेतृत्व म्हणून त्यांची तालिका अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सत्रातील जास्तीत जास्त कामकाज त्यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. तसेच विक्रमी सलग सात तास सभागृहाचे कामकाज चालविण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावावर आहे. त्या कामगिरी बद्दल विधानसभा अध्यक्षांनी सभागृहामध्ये आ. कुणावार यांचे कौतुक सुद्धा केले होते. त्याचप्रमाणे उत्कृष्ट सांसदपटू म्हणून त्यांना पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.
आ. कुणावार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुचित्रा पवार व सहकारी आमदारांचे आभार मानले. आ. कुणावार यांची पाचव्यांदा तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
जनतेच्या हिताचा निर्णय : आ. कुणावार
जनतेच्या सेवेसाठी दिलेली संधी, लोकशाही प्रक्रियेतील एक महत्त्वाची जबाबदारी आहे. या पदाचा मान राखणे, सभागृहातील कारभार शिस्तबद्धपणे पार पाडणे आणि सर्व पक्षांना समान न्याय देणे, ही माझी प्राथमिक भूमिका आहे. पण त्याहीपुढे जाऊन, मी ठामपणे ठरवलं की, फत आणि फत जनतेच्या हिताचा निर्णयच घेतला जाईल, असे आ. कुणावार म्हणाले.