अभय इंगळे,
दिग्रस,
sanjay-deshmukh : यवतमाळ वाशीम लोकसभा खासदार संजय देशमुख यांनी अखेर मुंबई येथे उबाठा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आणि सोमवार, 22 जूनला रात्री थेट दिग्रस गाठले. रात्री उशीरापर्यंत प्रतिक्षेत असलेल्या समर्थकांनी त्यांचे वाजत-गाजत जल्लोषात स्वागत केले.
ठाकरे गटाची साथ सोडून आलेल्या 6 खासदारामध्ये संजय देशमुख हे त्यांचे ‘कॅप्टन’ होते. ते उबाठा सेना सोडणारच याची चांगलीच चर्चा होती. तर या पक्षात जाऊच नये ही सुरवातीपासूनच त्यांच्या समर्थकांची मनोमन इच्छा होती. त्याचा प्रत्यय सोमवारी सर्वांनीच घेतला.
शेकडो कार्यकर्ते गाड्या घेऊन नांदेडला आपल्या नेत्याला घेण्यासाठी गेले होते. तर रात्री 10 पर्यंत पावसात वाट पाहत शेकडो समर्थक आर्णी नाक्यावर बसून होते. त्यांचे आगमन होताच आतषबाजीत व डीजे वाजवून समर्थकांनी जल्लोष केला.
विजयी मिरवणुकीप्रमाणे भव्य रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी स्वागताचे पोस्टर, मिठाई व पुष्पहार घेऊन समर्थक रॅलीच्या मार्गावर उभे होते. येथील नेताजी चौक, सराफा लाईन, दुर्गामाता चौक, शंकर टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मानोरा चौकातून त्यांच्या निवासस्थानी रॅलीचा समारोप झाला.
मंगळवारी सकाळपासून दिवसभर एक-एक करत, मित्रपक्षांचे, विविध संस्थांचे व शिवसेनेच्या हजारो पदाधिकारी व शिवसैनिकांनी खासदार संजय देशमुख यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान दोन दिवसांपासून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
उबाठा सेना पदाधिकाèयांना पोलिस ठाण्यात बसवले
खासदार संजय देशमुख यांच्या आगमनानंतर उबाठा शिवसेनेकडून रॅलीत विघ्न येऊ नये यासाठी पोलिसांनी त्यांचे ज्येष्ठ पदाधिकारी पूनम पटेल, शहरप्रमुख राहुल देशपांडे, राहुल धुळधुळे व शेखर चांदेकर या पदाधिकाèयांना रात्री 11 पर्यंत पोलिस ठाण्यात बसवून निगराणीत ठेवले होते.
शिवसेनेच्या पदाधिकाèयांकडून स्वागत
मंत्री संजय राठोड यांच्या अनुपस्थितीत शिवसेनेचे पदाधिकारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खा. देशमुखांची रॅली पोहचेपर्यंत उपस्थित होते. खासदारांचे आगमन होताच आतिषबाजीत त्यांचे वाजत-गाजत स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत पवार, राजुदास जाधव, गजानन डोहाळे, संजय हातगावकर, जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, येथील नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
विकास कामांसाठी पक्ष सोडला
लोकांनी मोठ्या अपेक्षेने मतदान करून मला खासदार केले. त्यामुळे मी मतदारसंघाचा चौफेर विकास करावा अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र आम्ही निधीअभावी हताश होतो. मुळात मी जमिनीवर काम करणारा व जनतेशी जोडलेला कार्यकर्ता असल्याने सर्वसामान्य लोकांच्या आणि मतदारसंघाचा विकासाचे ध्येय धोरण आखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.
- खासदार संजय देशमुख