मुंबई,
Shalarth scam spans राज्यातील शिक्षण विभागाला हादरवून सोडणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत अनेक गंभीर अनियमितता उघडकीस आल्या असून काही संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरली असून जवळपास 900 संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकमधील तपासादरम्यान समोर आलेली माहिती अधिकच खळबळजनक मानली जात आहे. उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करताना एकाच जावक क्रमांकाचा वापर करून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

यामुळे अधिकृत कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागलेल्या दस्तऐवजांमध्ये मोठे विरोधाभास आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, एकाच अधिकृत आदेशाखाली वेगवेगळ्या नावांच्या नोंदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या गंभीर बाबीची नोंद सरकार पक्षाने न्यायालयातही केली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके करत असून लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण क्षेत्रातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावेही समोर आली आहेत. बोगस शालार्थ आयडी नेमके कोणाच्या मंजुरीने तयार करण्यात आले, याचा तपास पहिल्या टप्प्यात झाला असला तरी या प्रकरणात आणखी काही संशयितांची चौकशी होण्याची शक्यता आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे शिक्षण विभागातील प्रशासनिक पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेले निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. त्यांचा जामीन अर्ज नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाने या प्रकरणाला संघटित व्हाइट कॉलर गुन्हेगारीचे स्वरूप असल्याचे निरीक्षण नोंदवत जामीन नाकारला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. जोशी यांनी हा निर्णय दिला. मार्च महिन्यात नाशिकरोड पोलिस ठाण्यात या प्रकरणी फसवणूक, कारस्थान आणि संघटित गुन्हेगारीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या घोटाळ्याचे नवे पैलू समोर येत असून येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.