मुंबई,
Strong arrival of the monsoon राज्यात गेल्या काही दिवसांपासून मंदावलेला मान्सून आता पुन्हा सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाची नोंद होत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी, मुंबईसह राज्यातील अनेक अंतर्गत भागांत २४ ते २७ जूनदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी पावसाच्या सरी बरसल्यानंतर आजही ढगाळ वातावरण राहणार असून हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातही मान्सूनने दमदार हजेरी लावली. जुन्नर तालुक्यातील कुमशेत परिसरात अल्पावधीत अतिवृष्टीसदृश पाऊस झाल्याने रस्ते, नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहू लागले. काही ठिकाणी पाण्याचा वेग इतका वाढला की वाहतुकीवर परिणाम झाला. स्थानिकांमध्ये संभाव्य नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातही मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला. सलग दोन तास कोसळलेल्या पावसामुळे गळमोडी नदीला पूर आला. नदीवरील तात्पुरता पूल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने नांदगाव-शिऊर मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली.
मराठवाड्यातील जालना शहर आणि परिसरातही दमदार पावसाने उकाड्यापासून मोठा दिलासा दिला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून खरीप हंगामाबाबत आशा वाढल्या आहेत.विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातही अखेर मान्सूनने दमदार एन्ट्री घेतली. दिवसभर कडक उन्हानंतर दुपारी अचानक वातावरण बदलले आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. जवळपास तासभर झालेल्या पावसामुळे उष्णतेच्या झळांपासून नागरिकांना दिलासा मिळाला. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती, त्यामुळे या पावसाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात होते. राज्यातील विविध भागांत सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळत असला तरी काही भागांत अतिवृष्टीमुळे नुकसान होण्याची शक्यता कायम आहे. पुढील काही दिवस मान्सूनचा जोर अधिक वाढण्याची चिन्हे असून प्रशासनाने सतर्क राहण्याचे संकेत दिले आहेत.