अनिल कांबळे
नागपूर,
student killed दुचाकीवरून जात असलेल्या दोन विद्यार्थ्यांना भरधाव कारच्या चालकाने धडक दिली आणि पसार झाला. ही घटना घटना सोमवारी दुपारी छत्रपतीनगर परिसरात घडली. या भीषण अपघातात एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. शेख जमाम शेख करीम (१६, रा. राहुलनगर, सोमलवाडा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. जखमी ओमप्रकाश मोहोड (१८) याच्यावर उपचार सुरू आहेत.
जमाम आणि ओमप्रकाश एकाच परिसरात राहतात. ओमप्रकाश हा धनवटे नॅशनल कॉलेज येथे शिक्षण घेत असून सोमवारी काही कामानिमित्त त्याला महाविद्यालयात जायचे होते. दोघेही जमामच्या एमएच-४०-ईव्ही-३३४० क्रमांकाच्या दुचाकीवरून कॉलेजमध्ये गेले होते. दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास दोघेही परत निघाले. छत्रपती हॉल येथून यू-टर्न घेत छत्रपती चौकाकडे जाताना मागून भरधाव आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दोघेही रोडवर पडून गंभीर जखमी झाले. याच दरम्यान आरोपी कारचालक घटनास्थळावरून पसार झाला.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. दोघांनाही उपचारासाठी जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जमामची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मेडिकल ट्रॉमा सेंटर येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जमामचे वडील शेख करीम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला असून फरार कारचालकाचा शोध सुरू आहे. पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत.