धक्कादायक! बंद घरात एकाच कुटुंबातील ४ जणांचे मृतदेह

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
नलगोंडा,
telangana-news : तेलंगणातील नलगोंडा येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बंद घरामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद किंवा आर्थिक अडचणींमुळे सामूहिक आत्महत्येची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
TELANGANA
 
 
ही घटना शहरातील तेलंगणा कॉलनी परिसरात उघडकीस आली. गेल्या काही दिवसांपासून संबंधित घरातून कोणतीही हालचाल दिसत नव्हती. त्यातच घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
 
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. आत प्रवेश करताच चार मृतदेह आढळले. मृतदेहांची अवस्था अत्यंत खराब होती आणि ते कुजलेल्या अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
मृतांमध्ये शेख सुलतान, त्यांची पत्नी हसीना आणि त्यांची दोन मुले यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. सुलतान हे स्थानिक बाजारात बॅग व्यवसाय चालवत होते, तर हसीना खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
 
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, ही घटना सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वी घडली असावी. मृतदेहांची स्थिती पाहता मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विष प्राशन, कौटुंबिक तणाव किंवा इतर काही कारण यामागे असू शकते, या सर्व दिशांनी तपास सुरू आहे.
 
फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे संपूर्ण नलगोंडा परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.