अनिल कांबळे
नागपूर,
conversion and blackmail case एका वायुसेनेच्या जवानाच्या पत्नीचे धर्मांतर, ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक शोषणाच्या गाजलेल्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत (एमसीआर) पाठविले आहे. अय्याज ताज मदारे (२६), अमीन शेख (३०) आणि हजरत मौलाना अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिस कोठडीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी तिन्ही आरोपींची सखोल चौकशी केली. त्यांच्या जबाबांची नोंद करण्यात आली तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे त्यांना सामोरे जाऊन विचारपूस करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर रविवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यापूर्वी हजरत मौलानाला मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान मौलानाने मुख्य आरोपी अय्याजने तक्रारदार महिलेला आपली पत्नी म्हणून ओळख करून दिल्याचा दावा केला. संबंधित महिला बुरखा परिधान करत असल्यामुळे संशय आला नसल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.
मात्र, या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न तो करीत असल्याचा पोलिसांना संशय असून त्याच्या जबाबातील विसंगतींची पडताळणी सुरू आहे. स्वतःचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करत तो शिक्षक असल्याचे सांगत आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही भारतीय हवाई दलातील जवानाची पत्नी आहे. डिसेंबर २०२४ मध्ये तिची अय्याजशी इन्स्टाग्रामद्वारे ओळख झाली होती.
८ फेब्रुवारी २०२५ रोजी मालमत्तेच्या व्यवहाराच्या बहाण्याने तिला वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. तेथे तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच या घटनेचे चित्रीकरणही करण्यात आले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी हे व्हिडिओ दाखवून महिलेला ब्लॅकमेल केले. त्याद्वारे तिचे वारंवार शोषण करण्यात आले तसेच तिच्याकडून सुमारे ३.९ लाख रुपये उकळण्यात आले. ३१ मे रोजी तिला मध्य प्रदेशातील तामिया येथे नेण्यात आले. तेथे मौलानाच्या उपस्थितीत तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.