आता प्लास्टिकपासून पेट्रोल! अवघ्या ३२ रुपयांत इंधनाचा दावा

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
वडोदरा,
petrol-diesel-from-plastic-waste : गुजरातमध्ये प्लास्टिक कचऱ्यापासून पेट्रोल आणि डिझेलसदृश इंधन तयार करण्याचा एक अभिनव प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे इंधनाच्या वाढत्या किमतींवर पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवरही मोठा उपाय मिळू शकतो.
 
 
 
petrol-diesel-from-plastic-waste
 
 
वडोदरा येथील गती शक्ती विद्यापीठातील संशोधकांनी मिश्र प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे इंधनात रूपांतर करण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे हा प्रयोग केवळ प्रयोगशाळेपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष वाहनांवरही तपासण्यात आला. या इंधनावर दुचाकी यशस्वीरित्या चालवून चाचणी पूर्ण करण्यात आली.
 
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या इंधनासाठी वाहनांच्या इंजिनमध्ये कोणताही मोठा बदल करण्याची गरज भासली नाही. साधारण १०० घनक्षमता असलेल्या दुचाकीने सामान्य पेट्रोलवर जसे अंतर कापले, त्याच्याजवळपास कामगिरी या नव्या इंधनावरही दिसून आली. एका लिटर इंधनावर सुमारे ६० किलोमीटरपर्यंत अंतर पार केल्याचा दावा करण्यात आला आहे.
 
या तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याची किंमत. १०० किलो प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून सुमारे ५० किलो इंधन तयार होऊ शकते. प्राथमिक स्तरावर या इंधनाची उत्पादन किंमत प्रतिलिटर सुमारे २४ रुपये इतकी येते. शुद्धीकरणानंतर अंतिम किंमत सुमारे ३२ रुपये प्रतिलिटरपर्यंत जाते, असा दावा संशोधकांनी केला आहे.
 
याशिवाय या इंधनामुळे प्रदूषणही नियंत्रित मर्यादेत राहते, असे चाचण्यांमधून दिसून आले आहे. प्रदूषण तपासणीच्या निकषांमध्येही हे इंधन योग्य ठरल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पर्यावरणपूरक आणि स्वस्त अशा दोन्ही निकषांवर हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो.
 
तज्ज्ञांच्या मते, दुर्गम भागांमध्ये किंवा ज्या ठिकाणी प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण मोठे आहे, अशा भागांत हे प्रकल्प अधिक फायदेशीर ठरू शकतात. लडाख, केदारनाथ, बद्रीनाथ यांसारख्या भागांत अशा प्रकल्पांची उभारणी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरल्यास भारताच्या इंधन क्षेत्रात मोठा बदल घडू शकतो.