वैभव सूर्यवंशीचा ‘प्राउड मोमेंट’ व्हायरल video

    दिनांक :23-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Vaibhav Suryavanshi's video अवघ्या 15 वर्षांच्या वयात क्रिकेटविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीसाठी आयुष्यातील अत्यंत खास क्षण अखेर समोर आला आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाल्यानंतर वैभवच्या हाती प्रथमच टीम इंडियाची अधिकृत जर्सी आली आणि हा क्षण त्याच्यासाठी भावनांनी भरलेला ठरला.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या खास क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. वैभवच्या हॉटेल रूमपर्यंत भारतीय संघाचे थ्रो-डाउन स्पेशालिस्ट रघू जर्सी घेऊन पोहोचले. दरवाज्यावर ‘प्लेयर नंबर 532’ असे लिहिलेले पाहूनच वातावरण खास झाले होते. दरवाजा उघडल्यानंतर वैभवने नम्रतेने रघू यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.
 
 

 jersey video 
 
जर्सी हातात घेताच वैभवच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याची भावना त्याच्या डोळ्यांत उमटली. आपल्या भावना व्यक्त करताना वैभवने सांगितले की, हा क्षण शब्दांत मांडणे कठीण आहे. बॅट हातात घेतल्यापासून टीम इंडियासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले आणि आज ते स्वप्न सत्यात उतरले आहे.वैभवने पुढे सांगितले की, जर्सी पाहताच त्याला काही क्षण विश्वासच बसत नव्हता. तो इतका आनंदी झाला होता की काय बोलावे हेच सुचत नव्हते. अनेकदा आयुष्यात काही क्षण असे येतात, जे शब्दांच्या पलीकडचे असतात आणि हा त्याच्यासाठी तसाच क्षण होता.
 
 
 
नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल हंगामात वैभव सूर्यवंशीने तुफानी फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले. त्याने 776 धावा करत ऑरेंज कॅप पटकावली. याशिवाय 72 षटकार ठोकत त्याने विक्रमांची मालिकाच रचली. एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये दमदार छाप पाडल्यानंतर आता वैभवसमोर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आहे. भारतीय क्रिकेटचा हा नवा तारा टीम इंडियासाठी कोणते नवे विक्रम प्रस्थापित करतो, याकडे आता संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.