अनिल कांबळे,
नागपूर,
vishwas-nangare-patil : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अप्पर महासंचालक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या (एडीजी) बदल्या रखडल्या होत्या. मात्र, गृहमंत्रालयाने आज मंगळवारी सायंकाळी एडीजींच्या बदल्याची यादा जाहीर केली. पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अप्पर पोलिस महासंचालकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नागरे पाटील यांची नागपूरच्या नव्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाकडे नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
गेल्या काही वर्षांत नागपूरमध्ये सायबर गुन्हे, अंमली पदार्थांची तस्करी, संघटित गुन्हेगारी, ऑनलाइन फसवणूक, महिला अत्याचार आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनुभवी आणि कठोर प्रशासकीय प्रतिमा असलेल्या विश्वास नागरे पाटील यांच्या नियुक्तीमुळे गुन्हेगारीविरोधातील कारवायांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विश्वास नागरे पाटील यांची राज्यातील धाडसी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख आहे. मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यावेळी दाखविलेल्या धैर्यामुळे ते देशभर चर्चेत आले होते. विविध जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये त्यांनी गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाया करून आपली स्वतंत्र छाप निर्माण केली आहे. कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि जनसंपर्क यांचा समतोल राखण्याची त्यांची कार्यशैली विशेष मानली जाते. गुरुवारी सकाळी ते नागपूर पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्विकारणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
नव्या आयुक्तासमोरील आव्हाने
नागपूर हे वेगाने विकसित होणारे महानगर असल्याने येथे गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत आहे. सायबर गुन्हेगारांकडून ‘डिजिटल अरेस्ट’, बनावट गुंतवणूक योजना, बँकिंग फसवणूक आणि सोशल मीडिया हॅकिंगसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. दुसरीकडे शहरात एमडी ड्रग्ज आणि अन्य अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सातत्याने कारवाया सुरू आहेत. संघटित गुन्हेगारी, अवैध व्यवसाय, वाढती वाहतूक कोंडी, रस्ते अपघात आणि महिला सुरक्षेचे प्रश्न यावर प्रभावी नियंत्रण मिळविणे हे नव्या पोलिस आयुक्तांसमोरील प्रमुख आव्हान असेल.
नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या
नागपूरकरांमध्ये विश्वास नागरे पाटील यांच्या नियुक्तीबाबत उत्सुकता आणि सकारात्मक अपेक्षा व्यक्त होत आहेत. गुन्हेगारांवर कठोर कारवाई, सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण, ड्रग्जविरोधी विशेष मोहीम, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा आणि नागरिकांशी थेट संवाद या क्षेत्रांमध्ये ठोस बदल दिसून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागपूर पोलिस दलात झालेला हा नेतृत्वबदल शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर धोरणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि जनतेचा विश्वास संपादन करण्याचे मोठे आव्हान विश्वास नागरे पाटील यांच्यासमोर असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि गुन्हेमुक्त शहर बनविण्याच्या दिशेने प्रभावी पावले उचलली जातील, अशी अपेक्षा नागपूरकरांकडून व्यक्त होत आहे.
नागपुरला मिळाले नवीन उपायुक्त
नागपूरचे आर्थिक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत सातव यांची छत्रपती संभाजीनगर येथे उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर अमरावतीतील उपायुक्त रमेश धुमाळ यांची नागपुरात उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. धुमाळ यांनी नागपुरात ग्रामीणचे अप्पर अधीक्षक म्हणून कार्य केले होते, हे विशेष.