नवी दिल्ली,
200 homes ashes in Delhi fire देशाची राजधानी नवी दिल्लीत येथे बुधवारी पहाटे भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. सेना भवन परिसरालगत असलेल्या कामगारांच्या तात्पुरत्या निवासस्थानी ही आग लागली. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण परिसराला विळखा घातला आणि सुमारे 200 झोपड्या जळून खाक झाल्या.मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास लागलेली आग वेगाने पसरली. पत्र्याच्या तात्पुरत्या खोल्या आणि एकमेकांना लागून असलेली घरे असल्यामुळे आगीने अल्पावधीत मोठे स्वरूप धारण केले. घटनास्थळी अग्निशमन दलाची 20 हून अधिक पथके तातडीने दाखल झाली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले.
सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. प्राथमिक माहितीनुसार, आगीत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.अधिकाऱ्यांच्या मते, विद्युत यंत्रणेमधील बिघाड किंवा एलपीजी सिलिंडरमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून सुरक्षा उपाययोजनांवर भर दिला जात आहे. अलीकडच्या काळात नवी दिल्लीतमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षाविषयक उपाय अधिक कडक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.