2030 पर्यंत 45% महिला अविवाहित?

अभ्यासातून समोर आला मोठा निष्कर्ष

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
गेल्या काही वर्षांत महिलांच्या लग्नाबाबतच्या बदलत्या दृष्टिकोनाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक मुली भविष्यात लग्न टाळतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच एका महत्त्वाच्या अभ्यासाने याबाबत वेगळंच चित्र समोर आणलं आहे. हा बदल लग्नसंस्था नाकारण्याचा नसून महिलांच्या अपेक्षा आणि प्राधान्यक्रम बदलल्याचा असल्याचे निष्कर्षातून स्पष्ट झाले आहे.मॉर्गन स्टॅन्लीच्या ‘राईज ऑफ द शीकोनॉमी’ या अहवालानुसार, 2030 पर्यंत अमेरिकेतील 25 ते 44 वयोगटातील जवळपास 45 टक्के महिला अविवाहित असतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, या आकडेवारीचा अर्थ महिलांनी लग्नाला नकार दिला आहे असा अजिबात नाही.
 
women unmarried
 
उलट महिलांमध्ये वाढत असलेले शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि बदलती सामाजिक मूल्ये हे या बदलामागचे प्रमुख घटक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अभ्यासानुसार, आजच्या महिला केवळ पारंपरिक चौकटीत विचार करत नाहीत. करिअर, आर्थिक स्थैर्य आणि स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य यांना त्या अधिक महत्त्व देत आहेत. त्यामुळे लग्न हा आयुष्यातील एक पर्याय आहे, बंधन नाही, अशी मानसिकता अधिक बळकट होताना दिसत आहे.भारतातही या बदलामागे काही गंभीर सामाजिक कारणे दिसून येतात.
हुंडा प्रथा, सासरी होणारा मानसिक व शारीरिक छळ, घरगुती हिंसा आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे अनेक तरुणी विवाहाबाबत अधिक सावध भूमिका घेत आहेत. त्यामुळे नात्यात सन्मान, सुरक्षितता आणि समानतेची अपेक्षा अधिक ठळक झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य प्रश्न “महिला लग्न का टाळत आहेत?” हा नसून, “समाज आणि नात्यांची मानसिकता बदलत्या काळानुसार बदलत आहे का?” हा ठरत आहे. महिलांचा विरोध लग्नसंस्थेला नसून, असमान आणि अन्यायकारक नातेसंबंधांना आहे, हेच या अभ्यासातून अधोरेखित झाले आहे.