नागपूर,
Nagpur University गणित विषयाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वित्तीय क्षेत्रातील उच्च वेतन आणि जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘ॲक्च्युअरी’ व्यवसायासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाच्या स्वायत्त गणित विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून बी.एस्सी. गणित (वित्तीय व ॲक्च्युरियल गणित विशेषीकरण) हा अभिनव अभ्यासक्रम सुरू केला आहे.
- गणितापासून आर्थिक जोखीम व्यवस्थापनापर्यंत ॲक्च्युअरी हे गणित, सांख्यिकी, वित्तशास्त्र आणि डेटा विश्लेषणाच्या आधारे आर्थिक जोखमींचे मूल्यांकन करणारे तज्ज्ञ असतात. विमा कंपन्या, बँका, गुंतवणूक संस्था आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांची मोठी मागणी आहे.
उद्योगाभिमुख अभ्यासक्रमाची जुळवाजुळव
या अभ्यासक्रमात फायनान्शियल Nagpur University मॅथेमॅटिक्स, रिस्क मॉडेलिंग, डेटा ॲनालिटिक्स, पायथॉन आणि आर प्रोग्रामिंगसारख्या आधुनिक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासक्रमाची रचना इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्च्युअरीज ऑफ इंडिया (IAI) च्या प्रारंभिक व्यावसायिक परीक्षांशी सुसंगत ठेवण्यात आली आहे.अप्रेंटिसशिप ऐम्बेडेड डिग्री प्रोग्राम (एईडीपी) अंतर्गत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपच्या संधी मिळणार आहेत. त्यामुळे पदवी शिक्षणादरम्यानच उद्योगातील अनुभव आणि रोजगारक्षम कौशल्ये विकसित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ॲक्च्युरियल ॲनालिस्ट, रिस्क ॲनालिस्ट, फायनान्शियल ॲनालिस्ट, डेटा ॲनालिस्ट आणि इन्व्हेस्टमेंट ॲनालिस्ट यांसारख्या विविध क्षेत्रांत करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सध्या या अभ्यासक्रमासाठी स्पॉट प्रवेश प्रक्रिया सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेश सुविधा केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.