लग्नपत्रिकेतील वय लावणार बालविवाहाला ब्रेक?

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
मुंबई,
Age printed on wedding invitation राज्यात बालविवाहाच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी राज्य सरकार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लग्नपत्रिकेवर वधू आणि वराच्या नावासोबत त्यांची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे विवाहापूर्वीच वधू-वरांचे वय स्पष्ट होईल आणि अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी प्रशासनाला अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राजस्थानमध्ये अशाच प्रकारचा नियम लागू करण्यात आला असून, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही हा प्रस्ताव पुढे नेण्याचा विचार सुरू आहे.
 
 
wedding invitation
 
राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या आकडेवारीनुसार काही जिल्ह्यांमधील बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक आहे. परभणी, बीड, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलींच्या विवाहाचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि भविष्यासमोरील आव्हाने अधिक गंभीर बनत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. बालविवाह रोखण्यासाठी राज्यात सध्या कायदे, नियम आणि विविध जनजागृती मोहिमा राबविल्या जात आहेत. आता लग्नपत्रिकेवर जन्मतारीख नमूद करण्याचा निर्णय अमलात आल्यास बालविवाहाला आळा घालण्यासाठी हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो.