खेळाडू-सांस्कृतिकपटूंची विशेष परीक्षा २९ पासून

अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयात होणार परीक्षा

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
annasaheb-gundewar-college : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विशेष परीक्षेचे आयोजन केले आहे. ही परीक्षा २९ जून ते १३ जुलै या कालावधीत काटोल रोडवरील अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयात दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत होणार आहे.
 
 

ngp  
 
 
राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच करिअर कट्टा यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या नियमित परीक्षांना उपस्थित राहता आले नव्हते. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी ही विशेष परीक्षा घेतली जात आहे.
 
महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतूद ५६(१)(i) तसेच परीक्षा निर्देश क्रमांक २२/२०२० मधील नियमांनुसार या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
 
विशेष परीक्षेसाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांच्या छाननीनंतर एकूण १२७ विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक मोतीराम तडस यांनी ही माहिती दिली.