गोंदिया
gondia crime गोंदिया शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या फुलचूर परिसरात मंगळवारी 23 जून रोजी घडलेल्या रुग्णवाहिका चालकाच्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत उलगडा केला असून याप्रकरणाचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. मृतक हा बहिणीचा छळ करत असल्याच्या कारणाने सुडाच्या भावनेतून मेव्हण्यानेच 50 हजार रुपयांची सुपारी देऊन त्याचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

gondia crime निरज तुलसीकुमार बनसोड (28) रा. खुर्शीपारटोला ता. आमगाव असे आरोपी मेव्हण्याचे नाव असून रोहित उर्फ आयुष नहार बंशकार (19), निशांत मंगल बंशकार (19) दोघेही राहणार बसोडी मोहल्ला, नैनपूर जि. मंडला व राहुल मिश्रा नंदा (32) रा. कनोजियाटोला, नैनपूर जि. मंडला अशी सुपारी किलरची नावे आहे. कारंजा येथील मृतक अनमोल वसंत रंगारी याची 23 जून रोजी फुलचूरजवळील शेतात धारदार हत्याराने हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाकडे तपासाची सुत्रे देण्यात आली.
gondia crime तपासादरम्यान मृतक अनमोल रंगारी याच्याकडून त्याच्या पत्नीला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याची माहिती समोर आली. या आधारे पोलिसांनी मृताचा साळा आरोपी निरज यास ताब्यात घेत चौकशी केली असता मृत अनमोल हा त्याच्या बहिणीला गेल्या सहा वर्षांपासून शारिरीक व मानसिक त्रास देत असल्याने सुडाच्या भावनेतून त्याचा खून केल्याचे त्याने कबूल केले. तर यासाठी मध्यप्रदेशातील नैनपूर येथील रोहित ऊर्फ आयुष याला 50 हजार रुपयांची सुपारी दिल्याचेही त्याने सांगितले. या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मध्यप्रदेशातील नैनपूर येथून सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपींनी खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. पुढील तपास गोंदिया ग्रामीण पोलिस करीत आहेत.
gondia crime असा केला गेम....
बहिणीला वारंवार त्रास देत असल्याच्या कारणातून आपल्या जिजाजीचा काटा काढण्याचा बेत निरजने आखला. त्यासाठी त्याने नैनपूर येथील त्याच्या मित्राला 50 हजाराची सुपारी दिली. घटनेच्या दिवशी 22 जून रोजी आरोपी रोहित हा त्याचे दोन साथीदार निशांत व राहुल यांच्यासह गोंदिया येथे आला. दरम्यान, निरजने मृत अनमोल यास दारू पार्टी करण्याच्या बहाण्याने फुलचूर येथे बोलवून घेतले. सर्वांनी पार्टी केल्यानंतर अनमोल मध्यधुंद अवस्थेत असताना आरोपींनी त्याला निर्जनस्थळी घेऊन जात लोखंडी साबळीने त्यांच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केला.