बालभारती झुकली; मात्र पुन्हा भाषिक खोडी

-फुले दांपत्याचा थेट उल्लेख टाळला -अधिकृत शुद्धिपत्रक निर्गमित

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
अमरावती,
class-3-textbook : इयत्ता ३ रीच्या पाठ्यपुस्तकात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेचा इतिहास ’मर्यादित’ केल्याप्रकरणी प्रहार शिक्षक संघटनेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याला अखेर अवघ्या ७२ तासांत मोठे यश आले आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी २१ जून रोजी पाठ्यपुस्तक मंडळ संचालिका आणि शिक्षण मंत्र्यांना दिलेल्या पुराव्यासह निवेदनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. बालभारतीने आपल्या अक्षम्य ऐतिहासिक चुकीची जाहीर कबुली देत अखेर राज्यभरातील शाळांसाठी अधिकृत’शुद्धिपत्रक’जारी केले आहे
.
 
 
KJL
 
 
 
पाठ्यपुस्तक मंडळाच्या संचालिका अनुराधा ओक यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या अधिकृत पत्रानुसार इयत्ता तिसरीच्या ’आपल्या सभोवतालचे जग भाग २’ या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्र. १५ वरील ’माहित आहे का तुम्हांला?’ या चौकटीत आता अधिकृत बदल करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकातील जुने वाक्य ’ही महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा होय’ हे पूर्णपणे बदलून आता तिथे ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिली मुलींची शाळा होय. ही भारतीयांनी मुलींसाठी स्थापन केलेली पहिलीच शाळा होय. असा नवीन मजकूर समाविष्ट केला आहे. या नवीन वाक्याच्या औचित्यावर बोट ठेवत प्रहार शिक्षक संघटनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. ही शाळा कोणी सुरू केली, याचे उत्तर अख्ख्या जगाला माहीत असताना, तिथे ’क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करणे बालभारतीला का डाचत आहे? ’भारतीयांनी’ या व्यापक शब्दाच्या आडोश्याखाली मूळ महापुरुषांचे नाव जाणीवपूर्वक अदृश्य किंवा मर्यादित करण्याचा हा प्रशासकीय घाट तर नाही ना? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.
 
 
प्रहारच्या भूमिकेचा विजय; स्पष्टीकरण
 
 
हा केवळ एका शब्दाचा बदल नसून देशातील स्त्री शिक्षणाच्या खर्‍या आणि जाज्वल्य इतिहासाचा विजय आहे, अशी भावना प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, राष्ट्रपुरुषांच्या आणि राष्ट्रमातांच्या जागतिक कार्याचा संकोच करणारी कोणतीही चूक आम्ही खपवून घेणार नव्हतो. बालभारतीने आमचे निवेदन गांभीर्याने घेऊन तात्काळ दुरुस्ती केली आणि २४ तासांत हे शुद्धिपत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले, ही समाधानाची बाब आहे.
 
 
नावाचा संकोच खपवून घेणार नाही
 
 
या गंभीर भाषिक आणि वैचारिक चुकीवर प्रहार शिक्षक संघटनेने आपली स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली आहे. पहिली शाळा ’भारतातली’ आहे हे मान्य करायला आम्ही बालभारतीला भाग पाडले, हा आमच्या पाठपुराव्याचा विजय आहे. परंतु, दुरुस्ती करताना ’फुले दाम्पत्याचे’ नाव डावलून केवळ ’भारतीयांनी’ असा मोघम उल्लेख करणे म्हणजे इतिहासाचे सामान्यकरण करून मूळ क्रांतीच्या जनकांचे श्रेय कमी करण्यासारखे आहे. बालभारतीने या वाक्यात सुधारणा करून तिथे ’क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी...’ असाच स्पष्ट आणि स्वाभिमानी उल्लेख समाविष्ट केला पाहिजे. इतिहासाशी अशी अर्धवट तडजोड प्रहार शिक्षक संघटना कधीही खपवून घेणार नाही, अशी ठाम मागणी महेश ठाकरे यांनी केली आहे.