नागपूर,
theater-nagpur : उपराजधानीत अनेक धडपडे व सर्जनशील कलाकार आहेत. स्पर्धांच्याही पुढे जाऊन प्रेक्षकांसाठी कला सादर व्हावी असा त्यांचा हेतू असतो. पण नाटकाच्या तालमी आणि प्रयोगासाठी जागा, त्यासाठी लागणारी सुसज्ज व्यवस्था आदींचा अनुशेष आजही कायम आहे. परिणामी सभागृहात नाटके वा इतर कार्यक्रम करण्याची वेळ कलाकारांवर येते. पण येत्या काही दिवसांत कलाकारांना लवकरच त्यांच्या हक्काचे नाट्यगृह मिळणार आहे. रंगचळवळीला चालना देण्यासाठी निरुपक फाऊंडेशन आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या पुढाकाराने बजाजनगर येथील स्मारक परिसरात ‘रंगमंडप’ या नावाने नाट्यगृह आणि ब्लॅक बॉक्स थिएटर आकारास येत आहे.
या नाट्यगृहाच्या निर्मिती प्रक्रियेत सिंहाचा वाटा असलेले अतुल आणि प्राजक्ता सांगतात, हा प्रवास खरे तर १२ वर्षांपूर्वी सुरू झाला. नागपुरातील रंगकर्मी, चित्रकार, गायक व इतरही कलांशी जुळलेल्या कलाकारांना एक हक्काची जागा असावी असा मानस होता. तो एका तपानंतर पूर्ण होत आहे. बजाजनगर येथील महाराष्ट्र गांधी स्मारक निधी पुणे या संस्थेच्या परिसरात सर्व सोईंनी युक्त हे नाट्यगृह आकारास येत आहे. विविध कलाकारांची एकमेकांसोबत मोट बांधली जावी आणि शहरात संगीत, नाट्य, साहित्य आदी विधांसाठी पोषक वातावरण तयार व्हावे हा यामागचा उद्देश असल्याचे प्राजक्ता सांगतात.
कसा असेल रंगमंडप
येथे तळमजल्यावर कलाकारांसाठी विश्रामगृह आणि गप्पांचे अड्डे जमवण्यासाठी कॅफे असणार आहे. पहिल्या मजल्यावर २०० आसनांचे नाट्यगृह, एक प्रायोगिक रंगमंच, एक छोटेसे पुस्तकालय, आर्ट गॅलरी आदी सुविधा असणार आहेत. रंगमंचावर नाट्यप्रयोगासाठी आवश्यक सामान पोहोचवणारी लिफ्ट, कलाकारांसाठी ग्रीन रूम, उत्कृष्ट ध्वनी आणि प्रकाश योजना आदी सर्व सुविधा कलावंतांशी चर्चा करून, त्यांच्या गरजेनुसार येथे केल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे येथे ३६५ गुणिले २४ तास तालमींसाठी जागा उपलब्ध राहणार आहे. ३६५ दिवसही येथे कलेची सेवा व्हावी, हाच प्रयत्न राहणार आहे. पुण्याचे प्रदीप वैद्य यांच्या संकल्पनेतून हा मंडप आकारास येत असल्याचे प्राजक्ता यांनी सांगितले.
एलकुंचवारांच्या नाटकाने होणार शुभारंभ
‘रंगमंडप’चे काम जवळपास पूर्ण झाले असून नागपूर येथील जागतिक कीर्तीचे नाटककार महेश एलकुंचवार यांच्या ‘एका नटाचा मृत्यू’ या अतुल पेठे दिग्दर्शित नाटकाने २५ जुलै रोजी ‘रंगमंडप’ चा शुभारंभ होणार आहे. नुकतेच अतुल पेठे नागपूर येथे आले असताना महेश एलकुंचवारांच्या उपस्थितीत याच जागी नाटकाच्या तालमी झाल्या. ३० जूनपासून ‘रंगमंडप’मध्ये स्थानिक नाट्यकर्मींचे तालमीचे प्रयोग सुरू होणार असल्याचे अतुल यांनी सांगितले.
नागपुरात कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील अंतर कमी करणारे, व्यावसायिक दबावांपासून मुक्त असे आपलेपणाचे नाट्यगृह उभे राहावे, हे अनेक वर्षांचे स्वप्न होते. येथे सर्जनशील नाट्यप्रयोग, सामाजिक जाणिवांशी संवाद आणि सहजीवनाचा आनंद देणारे कलात्मक उपक्रम खेळीमेळीच्या वातावरणात घडावेत. रंगमंडप हे केवळ मनोरंजनाचे केंद्र नव्हे, तर कला आणि सामाजिक सर्जनाचे मित्रत्वपूर्ण व्यासपीठ ठरावे.
प्राजक्ता अतुल