'ईठा’ चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
मुंबई
eetha-movie लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित निर्मिती होत असलेल्या बहुचर्चित ‘ईठा’ चित्रपटाच्या शीर्षकावर राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने आक्षेप नोंदवला आहे. विठाबाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, लोककलेतील त्यांच्या अमूल्य योगदानाचा आणि त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा योग्य सन्मान व्हावा, यासाठी चित्रपटाचे नाव थेट ‘विठाबाई’ किंवा ‘विठा’ असे ठेवावे, अशी मागणी विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली आहे.
 

eetha-movie Vithabai Narayangaonkar, Eetha movie controversy, NCP film and cultural department, 
या संदर्भात चित्रपटाचे निर्माते दिनेश विजान, दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर आणि मेडॉक फिल्म्स प्रॉडक्शन यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. प्रसिद्ध केलेल्या निवेदनात बाबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या लोककला परंपरेत लावणी आणि तमाशा या कलाप्रकारांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात विठाबाई नारायणगावकर यांचे मोठे योगदान राहिले आहे.
त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती होत असल्याने ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, मात्र चित्रपटाचे ‘ईठा’ हे शीर्षक विठाबाई यांच्या नावाशी थेट जोडलेले नसल्याने प्रेक्षकांमध्ये आणि सांस्कृतिक क्षेत्रात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या महान कलावंताच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे, त्यांच्या नावाचा थेट समावेश शीर्षकात असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
‘विठाबाई’ किंवा ‘विठा’ हे नाव अधिक समर्पक ठरेल आणि त्यामुळे नव्या पिढीपर्यंत त्यांच्या कार्याची आणि सांस्कृतिक वारशाची अचूक ओळख पोहोचेल, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. विठाबाई नारायणगावकर यांनी आपल्या अद्वितीय कलाविष्कारातून eetha-movie महाराष्ट्राच्या लोकपरंपरेला नवी उंची दिली असून त्यांच्या योगदानाचा गौरव करणे ही सामाजिक जबाबदारी असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले आहे.दरम्यान, दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर ‘छावा’ या चित्रपटाच्या यशानंतर ‘ईठा’ या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. मराठी संस्कृतीशी असलेले नाते आणि अभिनय कौशल्य लक्षात घेऊन तिची निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता चित्रपटाच्या शीर्षकावरून सुरू झालेल्या चर्चेमुळे या प्रकल्पाकडे सांस्कृतिक क्षेत्राचे लक्ष वेधले गेले आहे.