गडचिरोली,
educational tour आदिवासी विद्यार्थ्यांना देशाच्या लोकशाही संस्था, ऐतिहासिक वारसा, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि उच्च शिक्षणाच्या संधींची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत राबविण्यात येणार्या नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांतील 96 विद्यार्थ्यांची दिल्ली शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली आहे. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेण्याची विशेष संधी मिळणार आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत गडचिरोली, अहेरी आणि भामरागड येथील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा या सहलीत समावेश आहे. यामध्ये गडचिरोली प्रकल्पातील 52, अहेरी प्रकल्पातील 25 आणि भामरागड प्रकल्पातील 19 अशा एकूण 96 विद्यार्थ्यांचा सहभाग असून त्यांच्यासोबत 9 महिला व पुरुष कर्मचारी मार्गदर्शक म्हणून सहभागी होत आहेत. त्यामुळे एकूण 105 जणांचा ताफा दिल्ली दौर्यावर रवाना झाला आहे.
23 ते 28 जून या कालावधीत educational tour आयोजित करण्यात आलेल्या या सहलीत विद्यार्थी चार दिवस दिल्ली येथे मुक्काम करणार आहेत. राष्ट्रपती भवनातील भेटीव्यतिरिक्त विद्यार्थी संसद भवन, पंतप्रधान संग्रहालय, राष्ट्रीय विज्ञान केंद्र, आयआयटी दिल्ली, जंतरमंतर, राजघाट तसेच लाल किल्ला, कुतुबमिनार आणि राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय यासारख्या स्थळांना भेट देणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशाची संसदीय व्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती, सांस्कृतिक वारसा आणि उच्च शिक्षण संस्थांची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.विद्यार्थ्यांचा ताफा मंगळवारी गडचिरोली येथून रवाना झाला. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला.
विद्यार्थ्यांना या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा. देशातील सर्वोच्च घटनात्मक संस्थांची प्रत्यक्ष ओळख करून घेताना विद्यार्थ्यांनी नवे ज्ञान, अनुभव आणि प्रेरणा मिळवून आपल्या भविष्यासाठी मोठी स्वप्ने पाहावीत, अशी अपेक्षा यावेळी जिल्हाधिकार्यांनी व्यक्त केली.