नवी दिल्ली,
Gill dominates ICC rankings आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या फलंदाजांच्या क्रमवारीत मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील अलीकडील कामगिरीचा परिणाम थेट क्रमवारीवर दिसून आला असून अनेक दिग्गज खेळाडूंच्या स्थानात उलथापालथ झाली आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावत आपला दबदबा सिद्ध केला आहे. दुसरीकडे, भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने एकदिवसीय क्रमवारीत शानदार झेप घेत अव्वल स्थानाच्या शर्यतीत जोरदार एन्ट्री केली आहे.कसोटी क्रमवारीत जो रूटने दोन स्थानांची झेप घेत पुन्हा नंबर-1 स्थानावर कब्जा केला आहे. त्याच्या सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे त्याचे रेटिंग 871 वर पोहोचले आहे. मागील आठवड्यात अव्वल स्थानी असलेला इंग्लंडचाच हॅरी ब्रूक आता दुसऱ्या स्थानावर घसरला असून त्याचे रेटिंग 866 आहे. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने उल्लेखनीय प्रगती करत पहिल्यांदाच टॉप-10 मध्ये प्रवेश केला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल अजूनही अव्वल स्थानावर कायम आहे. मात्र भारतीय कर्णधार शुभमन गिलने तीन स्थानांची मोठी झेप घेत थेट दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. त्याच्या दमदार कामगिरीमुळे रेटिंग 791 पर्यंत पोहोचले आहे. विराट कोहली एका स्थानाने घसरत तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे, तर रोहित शर्मा चौथ्या स्थानावर कायम आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. श्रीलंकेचा चरित असलंका आणि इंग्लंडचा हॅरी ब्रूक यांनीही क्रमवारीत सुधारणा नोंदवली आहे. आगामी मालिकांमुळे पुढील काही दिवसांत ICC क्रमवारीत आणखी मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.