अमरावती,
heavy-rain : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मान्सूनचे मंगळवारी रात्रीपासून अमरावती शहर व जिल्ह्यात दमदार आगमन झाले. बुधवारी दुपारी ४ वाजतापासून तब्बल दिड तास आलेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात पाणी साचले. विशेष म्हणजे उकाड्यातून नागरिकांची सुटका झाली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

मंगळवारी रात्री दमदार पाऊस झाला. बुधवारी सकाळी काहीवेळ ढगाळ वातावरण होते. त्यानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश होता. मग, पुन्हा ढगाळ वातावरण होऊन साडेतीन वाजता रिमझीम पाऊस सुरू झाला. तो काही भागात होता तर काही भागात नव्हता. ४ वाजतानंतर चारही बाजुने ढग आकाशात दाटले आणि मुसळधार पावसाला सुरूवात झाली. विजांच्या कडकडाटासह पाऊस चांगलाच बरसला. गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनच्या चांगल्या पावसाची प्रतीक्षा करणार्या अमरावतीकरांची काही प्रमाणात गरमीतून सुटका झाली. या पावसाने नारायण नगर येथील राजेंद्र कॉलनी ते मोती नगरकडे जाणार्या मुख रस्तावरल नाल्याच्या बाजुला पाणी जाण्यासाठी पाईप टाकले ते बुजल्याने सर्व पाणी रस्त्यावर साचले होते. प्रशांत नगर भागातही अशीच स्थिती निर्माण झाली होती. टावर लाईन परिसरातील राजमंगल कॉलनीतल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत झालेल्या २४ तासात अमरावती जिल्ह्यामध्ये सरासरी ३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ८२.४ मिमी पावसाची नोंद नांदगाव खंडेश्वर तालुक्यात झाली. त्या खालोखाल प्रत्येकी ४२.६ मिमी पाऊस चांदूर रेल्वे व चांदूर बाजार तालुक्यात झाला. धारणीत ३१.६, चिखलदर्यात ३१.६, अमरावतीत ३९.९, भातकुलीत ३१.१, तिवसा ३९.५, मोर्शी ३६.६, वरूड ३१.५, दर्यापूर २०.१, अंजनगाव ३३.६, अचलपूर ३२.६, धामणगाव ४०.८ मिमी पावसाची नोंद झाली.
//दर्यापूर पावसाने ओलेचिंब
गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मान्सूनने अखेर दर्यापूर शहर व परिसरात दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर ओलेचिंब झाले असून रस्ते, नाल्यांना पाणी वाहू लागले आहे. पावसाच्या आगमनाने शेतकर्यांच्या चेहर्यावर समाधान दिसून येत आहे. सकाळपासून भयंकर गरमी आणि उकाडा असे वातावरण होते. दुपारनंतर अचानक आलेल्या मुसळधार पावसाने शहरातील बाजारपेठ, बसस्थानक आणि मुख्य चौकात पाणी साचले. सुमारे १ तासाच्या पावसात वातावरण थंड झाले. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी उन्हापासून दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली. पावसामुळे शेतकर्यांच्या मशागतीच्या कामांना आता वेग आला आहे. खरिपाच्या पेरणीसाठी जमीन तयार करणे, नांगरणी, कुळवणीची कामे शेतात जोरात सुरू झाली आहेत. सोयाबीन, कापूस, तूर या पिकांच्या पेरणीसाठी हा पाऊस अतिशय पोषक ठरणार आहे. दोन दिवसात नांगरणी करून पेरणीला सुरुवात करू. यंदा पीक चांगले येईल अशी आशा आहे, अशी प्रतिक्रिया शेतकर्यांनी दिली. हवामान विभागाने पुढील ३ दिवस तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पेरणीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकर्यांना पोषक वातावरण राहणार आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले होते. नगर परिषदेच्या कर्मचार्यांनी नाल्यांची पाहणी करून पाणी निचर्याची व्यवस्था केली आहे. मात्र, बाजार पेठेतील सखल भागातील काही दुकानात पाणी साचले होते.
शिंगणापुरात ढगफुटीसदृश पाऊस
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर (गावनेर-तळेगाव) येथे मंगळवारी रात्री झालेल्या हंगामातील पहिल्याच पाऊस ढगफुटीसदृश आल्याने परिसरातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवघ्या काही तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाण्याचे प्रचंड लोंढे वाहून गेले असून अनेक शेतांतील सुपीक माती खरडून गेली आहे. फळझाडे, इतर वृक्ष आणि संरक्षक कंपाऊंडचेही मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक शेतांमध्ये खोल चर निर्माण झाले असून पिकांसाठी उपयुक्त असलेला वरचा मातीचा थर वाहून गेला आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून शेतांच्या बांधांना तडे गेले आहेत. त्यामुळे आगामी हंगामातील शेती उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकसानग्रस्त शेतकरी सूर्यपाल चव्हाण यांनी प्रशासनाकडे तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी केली आहे. संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची नोंद घ्यावी तसेच नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाच्या नियमांनुसार तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.