सावधान महाराष्ट्र! पुढील काही तास मुसळधार पावसाचा अलर्ट

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
मुंबई, 
Heavy rain in the next few hours राज्यात अखेर मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची सक्रियता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, अनेक भागांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. तर राज्यातील उर्वरित बहुतांश भागांसाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
 
 
Heavy rain
 
 
मान्सूनने आता कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील मोठा भाग व्यापला असून पालघर ते वर्धा पट्ट्यापर्यंत त्याची प्रगती झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत उर्वरित भागातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबईत मान्सूनच्या पहिल्याच दमदार पावसाने जनजीवनावर मोठा परिणाम झाला. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती.
 
पावसाचा सर्वाधिक फटका मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेला बसला. काही मार्गांवर रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरील अनेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, तसेच सखल भाग आणि पाण्याजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.