हितेन धारपुरेचा जागतिक विक्रम

जगातील सर्वात लहान रोबोट आर्म तयार केला

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
hiten-dharpure : अत्रे लेआऊटस्थित स्कूल ऑफ स्कॉलर्सचा १७ वर्षीय विद्यार्थी हितेन धारपुरे याने जगातील सर्वात लहान रोबोटिक आर्म तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले आहे. त्याच्या या अभिनव संशोधनामुळे नागपूरसह महाराष्ट्राची मान जागतिक स्तरावर उंचावली आहे. यापूर्वीही जगातील सर्वात लहान रोबोटिक आर्मचा विक्रम अमेरिकेतील इंडियाना येथील केल्टन सेरा यांच्या नावावर होता.
 

ngp 
 
 
 
त्यांनी केलेल्या ४४.४९ मिमी (१.७५ इंच) आकाराच्या ३डी- प्रिंटेड रोबोटिक आर्मने हा विक्रम प्रस्थापित केला होता. हितेन ने तयार केलेल्या रोबोटिक आर्मचे प्रमाणित मोजमाप केवळ ३९.२५० मिमी असून त्याने हा जागतिक विक्रम मोठ्या फरकाने मोडीत काढला आहे. हितेनने विकसित केलेले हे उपकरण पूर्णपणे कार्यरत इलेक्ट्रो-मेकॅनिकल रोबोटिक आर्म असून ते मानवी विविध गुंतागुंतीच्या हालचाली करू शकते. या आर्ममध्ये मायक्रो सर्वो मोटर्स आणि अचूक पीडब्लुएम कंट्रोल मॉड्यूलचा वापर करण्यात आला आहे. लहान वस्तू अचूकपणे पकडण्याची क्षमता त्यामध्ये आहे. या प्रकल्पासाठी हितेनने एफडीएम तंत्रज्ञानाचा वापर करून कस्टम चेसिस डिझाइन केले आणि ३-डी प्रिंटिंगद्वारे निर्मिती केली. अतिशय मर्यादित जागेत सर्वो मोटर्स व वायरिंग अचूकपणे बसविण्याचे आवाहन त्याने यशस्वीपणे पेलले.
 
 
आपल्या या यशाबद्दल बोलतांना हितेन धारपुरे म्हणाला, मायक्रो- मॅन्युफॅक्चरिंगच्या भौतिक मर्यादा ओलांडून सहज उपलब्ध तंत्रज्ञानाच्या मदतीने उच्च- अचूकतेचे रोबोटिक्स विकसित करता येते, हे सिद्ध करणे हे माझे ध्येय होते. हा जागतिक विक्रम ‘विकसित भारत’ संकल्पनेतील योगदान असून जागतिक दर्जाच्या नवकल्पना आपल्या घरातूनही साकार होऊ शकतात, हे यातून अधोरेखित होते. संपूर्ण मॉडेल प्रगत सीएडी सॉफ्टवेअरच्या सहाय्याने सुरुवातीपासून तयार करण्यात आले.