तोतया पोलिसांचा सुपारी गोदामावर छापा

- व्यापाऱ्याला दिली गोळी मारण्याची धमकी : चार तोतयांवर गुन्हे दाखल

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
raid-betel-nut-warehouse : कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुपारी व्यावसायिकाला क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून धमकावल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कळमना पोलिसांनी चार तोतया पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी कलमना पोलिसांनी गौरव उर्फ विक्की हरिप्रसाद पांडे (३१, मानकापूर), सचिन सुरेशसिंग बैस (४२,नांदा, कोराडी), नरेंद्र लंबुजी चौबे (५७, गोपालनगर) आणि जितेंद्र अशोककुमार कुंदवानी (४२, अभिनव घरकुल योजना, चिखली) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केला आहे.
 
 

NGP 
 
 
तक्रारदार दीपक गुरमुखदास दर्यानी (५०, साईनगर, नेताजीनगर) हे आदिवासी ले-आऊट परिसरात त्रिशक्ती ट्रेडिंग कंपनी या नावाने सुपारी कटिंगचा व्यवसाय करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २३ जून रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास चार जण त्यांच्या गोदामात जबरदस्तीने घुसले. यातील एका व्यक्तीने स्वतःची ओळख “अंबुल ठाकूर” अशी करून देत आपण क्राइम डिपार्टमेंटचे अधिकारी असल्याचा दावा केला. आरोपींनी गोदामातील व्हिडीओ मोबाईलवर चित्रित करण्यास सुरुवात केली. तसेच गोदामात सडलेली सुपारी विक्री होत असल्याचा आरोप करीत अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. दर्यानी यांनी याला विरोध करून परवानगीशिवाय गोदामात प्रवेश केल्याबद्दल पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, संबंधित चौघे नंतर पोलिस ठाण्यातही पोहोचले. तेथेही कारवाई केल्यास गोळी मारून ठार करण्याची धमकी दिल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. या प्रकरणी कळमना पोलिसांनी गौरव पांडे, सचिन बैस, नरेंद्र चौबे आणि जितेंद्र कुंदवानी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २०४, ३२९, ३५१(३), २९६ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
 
 
पोलिस-पत्रकार असल्याची बतावणी
 
 
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी गौरव उर्फ विक्की पांडे याच्याविरुद्ध यापूर्वी १० गुन्हे दाखल आहेत. स्वतःला पत्रकार म्हणून सांगणाऱ्या सचिन बैस याच्याविरुद्ध एक गुन्हा, तर एका राजकीय संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या जितेंद्र कुंदवानी याच्याविरुद्ध चार गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच त्याच्यावर शासकीय धान्याच्या काळाबाजाराशी संबंधित प्रकरणेही दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास कळमन्याचे ठाणेदार प्रवीण काळे करीत करीत आहेत.