केगांवमध्ये पाण्यासाठी वणवण

महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाई, ग्रामस्थ आक्रमक

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
मारेगाव,
Kegaon Bodad water crisis तालुक्यातील केगाव (बोदाड) येथे मागील एक महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठी पायपीट करावी लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी भीमराव वानखेडे यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
 

Kegaon Bodad water crisis, 
केगाव या गावात आतापर्यंत शेतातील विहीर व बोअरवेलमधून पाणीपुरवठा होत होता. मात्र खरीप हंगाम सुरू झाल्यामुळे शेतीसाठी पाण्याचा वापर वाढल्याने गावातील पाणीपुरवठा बंद झाला. परिणामी, गावातील हातपंप व ग्रामपंचायतीच्या नळयोजना कोरड्या पडल्या असून नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त झाले आहेत. पाणीटंचाईमुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. अनेकांना दूरवरून पाणी आणावे लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. स्वच्छता व आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांनी यापूर्वीही ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्याचे सांगितले. गावातील नागरिकांनी गटविकास अधिकारी भीमराव वानखेडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी सरपंच जया ढाले, रोशन कांबळे, विठ्ठल पिंपळशेंडे, संतोष मेश्राम, विजय आत्राम, विकास पिंपळशेंडे, नीलेश राऊत, पंढरी देवाळकर, दशरथ देवाळकर, ओंकार पाके, शंकर आडे, अनिकेत ताठे, महेश राऊत, किशोर तुमराम यांनी निवेदनावर सही करीत गावाला तातडीने पर्यायी पाणीपुरवठा सुरू करून टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.