पुणे,
Ketan Aggarwal Murder Case केतन हत्याकांड प्रकरणात पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वरवर पाहता हे प्रकरण गूढ वाटत असलं तरी केतनच्या बहिणीच्या एका संशयामुळे संपूर्ण कट उघडकीस आला. सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन यांनी केतनला मार्गातून हटवण्यासाठी आखलेला प्लॅन अखेर पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांच्या माहितीनुसार, सिया आणि चेतन हे बराच काळ एकमेकांच्या संपर्कात होते. जानेवारी ते जून या कालावधीत दोघांमध्ये तब्बल 2 हजारांहून अधिक कॉल्स झाल्याचे तपासात समोर आले. या कॉल रेकॉर्ड्समुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला आणि तपासाची दिशा बदलली. केतनच्या अंत्यसंस्कारानंतर चार दिवसांनी सिया त्याच्या घरी गेली होती. यावेळी केतनच्या बहिणीने तिला काही प्रश्न विचारले. मात्र, सियाने दिलेली उत्तरे विसंगत आणि संशयास्पद वाटली. याच क्षणापासून केतनच्या बहिणीला काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली आणि त्यातूनच पोलिसांनी गुप्त तपास सुरू केला.
तपासादरम्यान चेतन चौधरी याच्याबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली. 18 जून रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5:40 या वेळेत चेतनच्या फोनचे इंटरनेट पूर्णपणे बंद होते. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच तपास अधिक तीव्र करण्यात आला.चौकशीत असे समोर आले की, लोकेशन ट्रॅकिंग टाळण्यासाठी चेतनने स्वतःचा फोन मुद्दाम दुकानात ठेवला होता. तसेच, तो स्वतःसोबत आपल्या एका कर्मचाऱ्याचा फोन घेऊन लोहागडकडे गेला होता. या हालचालींमुळे पोलिसांचा संशय अधिकच दृढ झाला.याशिवाय, 18 जून रोजी चेतनला अनेक फोन आले होते, मात्र त्याने एकाही कॉलला स्वतः उत्तर दिले नाही. त्याऐवजी दुकानातील कर्मचाऱ्यांनी फोन रिसिव्ह केल्याचे समोर आले. इंटरनेट बंद ठेवणे, लोकेशन लपवणे आणि कॉल्स टाळणे या सर्व गोष्टी एकत्र आल्याने पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. या सर्व पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सिया आणि चेतन यांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान दोघांनाही गुन्ह्याशी जोडणारे ठोस पुरावे समोर आले. आता या प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.