बांगलादेशातील 81 फुटी श्रीरामाच्या मूर्तीचे काम थांबले!

हिंदू समाज आक्रमक

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
ढाका,
Lord Rama idol in Bangladesh बांगलादेशमध्ये धार्मिक तणाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गाईबांधा परिसरात उभारण्यात येत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या 81 फुटी भव्य मूर्तीचे बांधकाम अचानक थांबवण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे स्थानिक हिंदू समाजात संतापाची लाट उसळली असून, विविध ठिकाणी निषेध आंदोलन सुरू झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गाईबांधा येथील मंदिर परिसरात प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती उभारण्याचे काम सुरू होते. मात्र, या प्रकल्पाला काही कट्टरपंथी गटांनी विरोध दर्शवण्यास सुरुवात केली. वाढत्या दबावामुळे आणि तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने बांधकाम तात्पुरते स्थगित केल्याचे सांगितले जात आहे.
 
 

ram 
 
या निर्णयानंतर स्थानिक हिंदू समाज रस्त्यावर उतरला. मशाल मोर्चे आणि निषेध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याचा आरोप करत, या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, भारतानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत बांगलादेश सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेबाबत कठोर भूमिका मांडली. हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांच्या संरक्षणाची जबाबदारी संबंधित सरकारची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
गेल्या काही बनगालादेशमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांवरील दबाव आणि हल्ल्यांच्या घटनांबाबत वारंवार चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे श्रीराम मूर्तीचे बांधकाम थांबवल्याच्या या घटनेने पुन्हा एकदा तिथल्या हिंदू समाजाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता या प्रकरणावर Tarique Rahman सरकार कोणती भूमिका घेते आणि वाढता तणाव कसा हाताळते, याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष लागले आहे.