महाकॅम्पाचे स्पष्ट आदेश खाते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काढण्याचे

*१०० कोटी ऍक्सिस बँकेत टाकल्याचे प्रकरण

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
प्रफुल्ल व्यास,
वर्धा, 
boer-tiger-project : सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाच्या विस्तारात गरमसूरसह ५ गावांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी कॅम्पांतर्गत उपसंचालक, क्षेत्रसंचालक बोर व्याघ्र प्रकल्प यांना देण्यात आलेला १०० कोटी निधी खाजगी बँकेत वळवण्यात आला. तो निधी बँक ऑफ महाराष्ट्रकडे वळता करावा, असे पत्र महाकॅम्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. रामाराव यांनी बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक क्षेत्र संचालकांना दिले आहे. दरम्यान, महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरणने १५ मे २०२४ रोजी काढलेल्या पत्रात बँक ऑफ महाराष्ट्रमध्येच खाते काढण्याच्या सुचना वन विभागाला दिलेल्या आहेत. त्याहीनंतर गरमसूर येथील पुनर्वसनाचा १०० कोटींचा निधी अ‍ॅसिस बँके कसा वळवण्यात आला हा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
 
boer-tiger-project
 
 
 
सेलू तालुयातील बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत गरमसूरसह ५ गावांच्या पुनर्वसनाची प्रक्रीया शासनस्तरावरून सुरू झाली आहे. त्यासाठी कॅम्पांतर्गत वनविभागाला तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. तो निधी राष्ट्रीयीकृत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जमा करण्यात आला होता. परंतु, बोर व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक कार्यालयाने ती रकम अ‍ॅसिस बँकेत वळती केली. महाकॅम्पानेही निधी संदर्भात अनियमितता समोर आली असून, वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय १०० कोटी निधी अ‍ॅसिस बँकेच्या खात्यात वळविण्यात आल्याने महाकॅम्पा प्रशासनाने तीव्र नाराजी व्यत केली आहे. त्याचा खुलासा सादर करण्याचे निर्देश देत निधी त्वरित बँक ऑफ महाराष्ट्रच्या मूळ खात्यात परत जमा करून त्याबाबत या प्राधिकरणाला कळविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, महाकॅम्पाने १५ मे २०२४ रोजी काढलेले पत्र तरुण भारतच्या हाती लागले असुन त्यात १२ मार्च २०२४ रोजी सुकाणू समितीच्या बैठकीत डिजिटल बँकींग सोल्यूशन या प्रणालीची अमलबजावणी करण्याकरिता मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे वनवृत्त, वनविभाग व वनपरिक्षेत्र स्तरावर बँक ऑफ महाराष्ट्रमध्येच कॅम्पाचे बचत खाते उघडण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्या निर्देशानुसार गरमसुरसह ५ गावांच्या पुनर्वसनाकरिता १०० कोटी रुपये बँक ऑफ महाराष्ट्रमध्येच आले. परंतु, त्यानंतर ते पैसे बँक ऑफ महाराष्ट्रमधून काढून अ‍ॅसिस बँकेत टाकण्यात आले, हे उल्लेखनिय!
 
 
वरिष्ठांच्या सल्ल्यानेच निर्णय
 
 
या संदर्भात बोर व्याघ्र प्रकल्पाचे उप संचालक मंगेश ठेंगडी यांच्यासोबत संपर्क केला असता तो १०० कोटींचा निधी वरिष्ठांच्या सल्ल्याने अ‍ॅसिस बँकेत वळवण्यात आला असल्याचे बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी यांनी व्हॉट्अ‍ॅपवर दिलेल्या प्रतिक्रियेत कळवले आहे.