अग्रलेख
legislative council elections महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीने मिळविलेला विजय हा महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकीय वास्तवाचे प्रतिबिंब आहे. १७ पैकी १६ जागांवर विजय मिळवून महायुतीने आपले राजकीय वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. त्यापैकी ११ जागा एकट्या भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत. महायुतीचा हा विजय संघटनशक्तीचा, राजकीय नियोजनाचा, नेतृत्वावरील विश्वासाचा आणि विरोधकांच्या विकल अवस्थेचा एकत्रित परिणाम आहे. लोकशाहीत जनतेचा किंवा लोकप्रतिनिधींचा कौल ज्या पक्षाच्या बाजूने जातो, त्याचे स्वागत झाले पाहिजे. त्यामुळे महायुतीने हा विजय मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करावेच लागेल. राजकारणात कुणीही नाहक जिंकत नाही आणि विनाकारण पराभूत होत नाही. प्रत्येक विजयामागे काही कारणे असतात आणि पराजयाचीही असतातच. आज महाराष्ट्रात महायुतीच्या विजयामागे सर्वांत मोठे कारण म्हणजे भाजपाच्या नेतृत्वातील मजबूत संघटनात्मक यंत्रणा, सूक्ष्म नियोजन, कार्यकर्त्यांचे कष्ट आणि नेतृत्वावर असलेला विश्वास. अनेकदा भाजपाच्या यशाकडे सत्तेच्या ताकदीच्या किंवा संसाधनांच्या चष्म्यातून पाहिले जाते. पण ते संपूर्ण सत्य नाही. भाजपाला आजचे दिवस सहज मिळालेले नाहीत. त्यामागे पाच दशकांचा संघर्ष आहे. १९८४ मध्ये भाजपाचे संसदेत केवळ दोन खासदार होते. अनेकांनी त्या पक्षाचे राजकीय भविष्य संपल्याचे भाकीतही केले होते. त्या स्थितीतही भाजपाने हार मानली नाही. ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा और कमल खिलेगा...” हे शब्द सतत प्रेरणा देत राहिले. त्या शब्दांमागे आत्मविश्वास होता, संघर्षाची तयारी होती आणि दीर्घकालीन राजकीय ध्येय होते. त्या शब्दांना प्रतिसाद देणारी कार्यकर्त्यांची फळी होती. त्या फळीने अनेक दशके पेरणी केली तेव्हा सध्याचे पीक आले.

भाजपाला सलग सत्ता मिळाली ती गेल्या दहा-बारा वर्षांत. तत्पूर्वी, क्वचितच सत्ता मिळाली. बहुतेकदा सत्तेने हुलकावण्या दिल्या. पण, सत्तेच्या बाहेर राहूनही भाजपाने संघटन वाढविले. बूथ पातळीपर्यंत कार्यकर्ते उभे केले. कार्यकर्त्यांनी वैचारिक बांधिलकी जपली. सत्ता नसली तरी कार्यकर्ते टिकून राहिले. आजच्या विरोधकांनी भाजपाच्या या इतिहासातून शिकण्याची गरज आहे. कारण सध्या महाराष्ट्रातील विरोधकांच्या राजकारणाचे सर्वांत मोठे संकट त्यांच्या पराभवाचे नाही, तर त्यांच्यातील आत्मविश्वासाच्या अभावाचे आहे. काँग्रेसवाल्यांना किंवा त्यांच्या मित्रपक्षांना विरोधी पक्षात राहणे आवडत नाही. कारण विरोधी पक्षाची भूमिका निभावणे अतिशय आव्हानात्मक असते. मुद्दा जय-पराजयाचा नसतोच. तो मानसिकतेचा असतो. पराभव हा राजकारणाचा अपरिहार्य भाग आहे. पराभवामागील कारणांचा प्रामाणिकपणे शोध घेण्याची तयारी असावी लागते. या निवडणुकीत प्रामुख्याने विरोधकांची मते फुटली. अनेक ठिकाणी क्रॉस व्होटिंग झाल्याच्या चर्चा झाल्या. काही ठिकाणी मतदारांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना साथ दिली नाही. संघटनेतील असंतोषाचे, संभ्रमाचे आणि नेतृत्वावरील विश्वास कमी होत असल्याचे हे लक्षण आहे, हे विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे आणि त्यानुसार सुधारणा केल्या पाहिजेत.
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महायुतीने स्वतःच्या मतांबरोबरच बाहेरची जवळपास शंभर मते खेचली असे म्हणतात. राजकारणात हे नवीन नाही. निवडणुकीतील यश हे स्वतःची मते टिकविण्यासोबतच विरोधकांची मते आकर्षित करण्यावरही ठरत असते. त्यालाच राजकीय व्यवस्थापन म्हणतात. महायुतीने ते केले. प्रश्न एवढाच आहे की विरोधकांना, कमी असली तरी, स्वतःची मते का टिकविता आली नाहीत? आपल्या मतदारांमध्ये, लोकप्रतिनिधींमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात ते का अपयशी ठरले? आपण एखाद्यावर आमिषाचा आरोप करीत असू तर त्या आमिषाला बळी पडणाऱ्याला बोल लावायचा की नाही? काही फक्त दोषारोप करण्यातच धन्यता मानायची? काही वर्षांपूर्वी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले. भाजपाला रोखणे हा त्यांचा समान कार्यक्रम होता. भाजपाविरोध हा ‘राजकीय’ उद्देश असू शकतो; तो दीर्घकालीन राजकीय विचार होऊ शकत नाही. जनतेला पर्यायी दृष्टी व आश्वासक विचार हवा असतो. महाराष्ट्राच्या विकासासाठी विरोधकांकडे कोणता आराखडा आहे? उद्योग, शेती, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा यावर विरोधकांची भूमिका काय आहे?... या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. महाविकास आघाडी त्यात पूर्णपणे पिछाडली आहे आणि फक्त भाजपाद्वेषाने पछाडली आहे. त्यामुळेच अशा विवेकासह स्वतःच्या पराभवाची मीमांसा करणे आघाडीला जमेनासे झालेले आहे. पक्षनिष्ठा, वैचारिक निष्ठा आणि संघटनेशी असलेली बांधिलकी यांमुळेच कठीण काळात पक्ष टिकतो. आज विरोधकांकडे नेमका याच गोष्टींचा अभाव आहे. सत्ता गेली की अस्वस्थता वाढते आणि निष्ठा डळमळते. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे तेच झाले आहे आणि जोवर ते प्रामाणिक आत्मपरीक्षण करीत नाहीत, तोवर ते होत राहणार आहे.
भाजपाने अनेक दशके सत्तेबाहेर राहूनही आपली विचारधारा आणि संघटन जपली. विरोधी बाकांवर बसूनही पक्ष वाढविला. आजच्या विरोधकांनी भाजपाकडून धडा घेतला पाहिजे की, सत्ता हा राजकारणाचा शेवट नसतो आणि सत्ता गेली किंवा मिळाली नाही म्हणून पक्ष संपत नसतो. उलट, सत्तेबाहेरचा काळ हा संघटन मजबूत करण्यासाठी, नव्या नेतृत्वाला घडविण्यासाठी आणि आत्मपरीक्षणासाठी सर्वोत्तम काळ असतो. आता दशकभराहून अधिक काळ विरोधी पक्ष बव्हंशी सत्तेबाहेर आहेत. पण, त्यांचे अख्खे दशक भाजपावरील टीकेत वाया गेले. राजकारणात टीकाटिप्पणी होतेच. पण, इतरांवर टीका करताना स्वतःकडे कधी तरी पाहावेच लागते ना! विशेषतः काँग्रेसकडून अशा आत्मपरीक्षणाची अपेक्षा आहे. काँग्रेस हा त्यातल्या त्यात ‘पक्ष’ आहे म्हणून ही अपेक्षा. महाराष्ट्रावर अनेक दशकांपर्यंत वर्चस्व गाजविणारा पक्ष आज अनेक भागांत दुय्यम किंवा तिय्यम क्रमांकावर पोहोचला आहे. अनेक ठिकाणी शून्यावर आला आहे. नेतृत्वाची दुसरी फळी निर्माण करण्यात अपयश, कार्यकर्त्यांशी कमी झालेला संवाद, निर्णयप्रक्रियेचे केंद्रीकरण आणि स्पष्ट राजकीय भूमिकेचा अभाव यामुळे काँग्रेस पक्ष कमकुवत झाला आहे. सत्तेच्या काळात काँग्रेसचे नेते गब्बर झाले.legislative council elections आता ते पक्षाला काडीचीही मदत करीत नाहीत. उलट, त्यांच्याच घरातले लोक या ना त्या पद्धतीने सत्तेशी घरठाव करण्याचा प्रयत्न करीत असतात. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उदाहरण पाहा. शरद पवार यांच्या पक्षाची स्थिती पाहा. त्यांचे राजकीय कौशल्य वादातीत असले तरी केवळ अनुभवी नेतृत्वावर राजकारण चालत नाही. नवीन नेतृत्व, नवीन ऊर्जा आणि संघटनात्मक विस्तार यांची आवश्यकता असते. ते ना उद्धव ठाकरेंच्या पक्षात आहे, ना शरद पवारांच्या!
लोकशाहीत सत्ताधारी पक्ष जितका मजबूत असावा लागतो, तितकाच मजबूत विरोधी पक्षही आवश्यक असतो. विरोधक नसतील तर सरकारवर प्रभावी अंकुश राहत नाही. धोरणांचे-निर्णयांचे मूल्यांकन नीट होत नाही. जनतेच्या प्रश्नांना पर्यायी माध्यम मिळत नाही. ब्रिटनमध्ये विरोधी पक्षाला ‘गव्हर्नमेंट इन वेटिंग’ म्हटले जाते. कारण विरोधक हा भविष्यातला पर्याय असतो. महाराष्ट्रातील विरोधकांनीही स्वतःला नुसत्या विरोधकाच्या नव्हे तर अशा प्रभावी पर्यायाच्या स्वरुपात उभे करणे आवश्यक आहे. आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर, यंत्रणेवर किंवा विरोधकांच्या संसाधनांवर फोडून उपयोग नाही. कार्यकर्त्यांचा विश्वास परत मिळवावा लागेल. वैचारिक स्पष्टता निर्माण करावी लागेल. संघटन उभे करावे लागेल. केवळ माध्यमांतील वक्तव्यांतून राजकारण होत नाही. राजकारणातील यशासाठी जनतेत जावे लागते, संघर्ष करावा लागतो, प्रश्न उचलावे लागतात आणि पर्याय द्यावा लागतो. यातले काहीच न करता विरोधकांना सत्ता हवी असेल तर ते कायम ‘वेटिंग’वरच राहतील. नेभळट, बोटचेपे, बुळचट, घाबरट, संभ्रमित आणि बिनकण्याचे विरोधक लोकशाहीच्या कामाचे नसतात. तिला अभ्यासू, वैचारिक, संघर्षशील आणि सक्षम विरोधक हवेत. महायुतीच्या विजयाच्या निमित्ताने, विरोधकांना पुन्हा एकवार आरशात स्वतःला न्याहाळण्याची संधी या निकालाने दिलेली आहे. ती संधी घ्यायची की आरशाकडे पाठ वळविण्याची सवय कायम ठेवायची हे विरोधकांनीच ठरवायचे आहे.