अनिल कांबळे,
नागपूर,
operation-thunder : गेल्या काही महिन्यांपासून शहरात ‘ऑपरेशन थंडर’ चा गाजावाजा सुरु असून आता शहरात अंमल पदार्थ विक्री आणि तस्करी बंद झाल्याचे चित्र पोलिसांनी निर्माण केले. मात्र, शहरात राजरोसपणे अंमली पदार्थांची विक्री सुरु आहे. जुनी कामठी परिसरात एमडी विक्री सुरु होती. पोलिसांनी दोन ड्रग्ज तस्करांना एमडीसह अटक केली. गेल्या काही दिवसांतील एमडी विक्रेते आणि तस्करांची संख्या बघता ‘ऑपरेशन थंडर’चा परिणाम झाल्याचे चित्र दिसत नाही.

जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने अमली पदार्थांची विक्री करणा-या दोन तस्करांना अटक केली. कारवाईत पोलिसांनी एमडी पावडरसह १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सलमान उर्फ माया मंजूर अहमद (३०, नया बाजार, कामठी) आणि मोहम्मद बिलाल नागानी हनिफ नागानी (३८, बुनकर कॉलनी, कामठी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.माहितीनुसार, बुधवारी चार वाजताच्या दरम्यान जुनी कामठी पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान, बडी मस्जिद, नया बाजार परिसरातील जमाल डेली नीड्स दुकानासमोर दुचाकीवर (एमएच ४० डी.ए. ७४५६) उपरोक्त आरोपी उभे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पाळत ठेवून दोघांना थांबवले. त्यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याच्या संशयावरून त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे लपवलेली १२.६५ ग्रॅम एमडी पावडर मिळून आली. आरोपी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी या ड्रग्जची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ड्रग्ज पावडर, मोबाईल तसेच दुचाकी असा एकूण १ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत त्यांना अटक केली.