मनपा स्थायी समिती सभागृहाचे 'टीपू सुलतान' नामकरण बेकायदेशीर

प्रशासनाला वकिलाची नोटीस:छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
अकोला,
akola-news : येथील महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला देण्यात आलेले 'शहीदे वतन हजरत टीपू सुलतान सभागृह' हे नाव पूर्णपणे बेकायदेशीर आणि शासकीय नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचा दावा करत,उदय महा यांच्या वतीने वकील अ‍ॅड. मुकुंद जालनेकर यांनी २३ जून रोजी मनपा आयुक्त, महापौर आणि स्थायी समिती सभापती यांना ही नोटीस दिली आहे.
 
 
AKOLA
शासकीय इमारती आणि वास्तूंना नावे देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे स्पष्ट नियम आणि राजशिष्टाचार आहेत. शासनाने यासाठी थोर आणि ऐतिहासिक व्यक्तींची एक अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, शासनाच्या या अधिकृत यादीत 'टीपू सुलतान' या नावाचा कुठेही समावेश नाही.त्यामुळे शासनाच्या यादीबाहेरचे नाव अधिकृत शासकीय सभागृहाला देणे हा थेट राज्य शासनाच्या प्रशासकीय आदेशांचा आणि नियमावलीचा भंग असून, ही कृती पूर्णपणे अवैध ठरते.त्यामुळे आयुक्त, महापौर आणि स्थायी समिती सभापती या तिघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
 
 
या कायदेशीर नोटीसमध्ये केवळ आक्षेप न नोंदवता प्रशासनाला कायदेशीर पर्यायही सुचवण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने अधिकृत केलेल्या थोर व्यक्तींच्या यादीत छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव समाविष्ट आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने विहित मुदतीत टीपू सुलतान यांचे अवैधरित्या दिलेले नाव तात्काळ हटवावे आणि त्याऐवजी नियमांनुसार 'छत्रपती संभाजी महाराज सभागृह' असे नामकरण करावे, अन्यथा पुढील कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा नोटीस मधून देण्यात आला आहे.