मुंबई,
Mumbai local train मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल ट्रेन ही दररोज लाखो प्रवाशांच्या प्रवासाचा आधार आहे. मात्र याच लोकलमध्ये मंगळवारी रात्री घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील धावत्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या वादातून एका 22 वर्षीय तरुणाची चाकूने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे लोकल प्रवासाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 जूनच्या रात्री चर्चगेट ते नालासोपारा फास्ट लोकलमध्ये हा प्रकार घडला. लोकल ट्रेन क्रमांक 90663 अंधेरी ते बोरिवली दरम्यान प्रवास करत असताना, मुसळधार पावसामुळे डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद हळूहळू वाढत जाऊन त्याचे रूपांतर शाब्दिक बाचाबाचीत आणि नंतर हातघाईत झाले.
या दरम्यान, आरोपीने Mumbai local train रागाच्या भरात आपल्या बॅगमधील चाकू काढून तरुणाच्या पोटावर वार केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात 22 वर्षीय मयंक लोहार गंभीर जखमी झाला आणि डब्यातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे सहप्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.ही लोकल रात्री सुमारे 11 वाजून 4 मिनिटांनी बोरिवली स्थानकात पोहोचली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर 11 वाजून 22 मिनिटांनी मयंक याला मृत घोषित केले. या घटनेनंतर आरोपीने संधी साधून बोरिवली स्थानकावरून पळ काढल्याचेही समोर आले आहे.घटनेनंतर पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजसह विविध तांत्रिक पुराव्यांची तपासणी केली जात आहे. आरोपीची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, काही Mumbai local train महिन्यांपूर्वीही मुंबई लोकलमध्ये अशाच प्रकारची हिंसक घटना घडली होती. जानेवारी महिन्यात मालाड रेल्वे स्थानकावर किरकोळ वादातून एका महाविद्यालयीन प्राध्यापकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर या नव्या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबई लोकलमधील या सलग घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.