अन् तो बाप ढसाढसा रडला... पोलिसांचे मानले आभार

सुसाईड नोट लिहून मुलाने सोडले होते घर

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
Beltarodi police वडिलांनी बारावीत शिकणाऱ्या मुलाला अभ्यास करण्यासाठी रागावले. मात्र, वडिलांचे शब्द मुलाच्या मनाला बोचले. तो लगेच सुसाईड नोट लिहून थेट घरातून निघून गेला. आईने सुसाईड नोट बघताच तिच्या हृदयाचा ठोका चुकला. लगेच आईवडिलांसह नातेवाईकांची शोधाशोध सुरु झाली. प्रकरण बेलतरोडी पोलिसांपर्यंत पोहचले. बेलतरोडी पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवित संपूर्ण शहर पिंजून काढले. पहाटेच्या सुमारात एका उद्यानाच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून मुलाला शोधून काढले. मुलाचे समूपदेशन करीत पोलिस ठाण्यात आणले. घर सोडून गेलेल्या काळजाच्या तुकड्याला बघताच आईवडिलांच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हास्य फुलले. मुलाला छातीशी कवटाळून तो बाप ढसाढसा रडला. पोलिसांनी समूपदेशन करुन मुलाला कुटुंबाच्या स्वाधीन केले.
 

v 
बेलतरोडी-मनिषनगर मनिषनगरात राहणाऱ्या उच्चशिक्षित दाम्पत्यांना एक मुलगा व मुलगी आहे. मुलगी रशियामध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे तर मुलगा सुयश (काल्पनिक नाव) हा बारावीत शिकतो. त्याला इंजिनिअर व्हायचे असल्यामुळे त्याचे ट्यूशन क्लासेस सुरु आहेत. दोन्ही मुले व्यावसायिक शिक्षणाकडे वळल्यामुळे पालकांना समाधान होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुलगा सुयश हा टॅबवर गेम खेळण्याकडे वळला होता. तो अभ्यासाच्या वेळात गेम खेळताना दिसत होता. मात्र, मनोरंजनासाठी मुलगा गेम खेळत असावा, असे समूजन पालक दुर्लक्ष करीत होते. मात्र, एवढ्यात त्याचे टॅबवर सक्रिय राहणे वाढल्यामुळे वडिलाने त्याला रागावले. अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगितले. वडिलांनी रागाच्या भरात बोललेले शब्द त्याच्या मनाला बोचले. त्याने रविवारी दुपारी दोन वाजता एक सुसाईड नोट लिहिली. ‘मी जीवाचे बरेवाईट करणार आहे. माझा शोध घेऊ नका.’ असे लिहून चिठ्ठी टेबलवर ठेवली आणि घरातून निघून गेला.
पोलिसांनी दिला आधार
सायंकाळी सुसाईड नोट आईच्या हातात पडली आणि तिने हंबरडा फोडला. पती-पत्नी बेलतरोडी ठाण्यात पोहचले. त्यांनी ठाणेदार रितेश अहेर यांची भेट घेतली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले आणि चार पथके तयार करुन मुलाच्या शोधासाठी रवाना केले. ते स्वत: रात्रीला मुलाच्या शोधासाठी गस्तीवर निघाले. रेल्वे ट्रॅक परिसर, सोनेगाव तलाव, खामला परिसर, मनीष नगर, उद्याने, सार्वजनिक स्थळे, मित्रमंडळींची घरे तसेच इतर संभाव्य ठिकाणी युद्धपातळीवर शोध मोहीम राबविण्यात आली. जवळपास दीडशेवर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
असा लागला शोध
रात्री दोन वाजता मनिषनगरातील एका उद्यानात कसून शोध घेत असताना पोलिसांना एका बेंचवर सुयश झोपलेला दिसून आला. त्यांनी ठाणेदार अहेर यांना माहिती कळवली. मुलगा सुखरुप मिळाल्याचे कळताच पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मुलाल घेऊन ते बेलतरोडी ठाण्यात पोहचले. पालकही नातेवाईकांसह उपस्थित होते. पोलिसांना बाप-लेकांची भेट घडवून आणली. दोघेही एकमेकांनी बिलगून रडायला लागले. दोघांच्या मनात पश्चातापाची भावना होती. समूपदेशन केल्यानंतर मुलाला कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.
मुलगा घरातून निघून Beltarodi police गेल्याचे कळताच घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच पथके तयार करुन स्वत: रात्रीची शोधमोहीम सुरु केली. उद्याने, तलाव, बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि अन्य परिसर पिंजून काढला. मुलाचा यशस्वीपणे शोध घेण्यात आला. मुलगा सुखरुप सापडल्याचा आनंद आहे.
- रितेश अहेर (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बेलतरोडी पोलिस स्टेशन)