राष्ट्रसंतांच्या विचारधारेला युजीसी मान्यता कधी?

बोथे गुरुजींना पद्मश्री परत करण्याचे आवाहन

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-university : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार आणि संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने नागपूर विद्यापीठात २०१५ पासून 'राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा' हा एम.ए. अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. मात्र, तब्बल ११ वर्षांनंतरही या अभ्यासक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोगाची (युजीसी) मान्यता मिळालेली नसल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर श्रीगुरूदेव युवामंचाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित करत विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
 
 
 
nagpur-university
 
 
- पदवी असूनही संधींपासून वंचित
 
 
युवामंचाच्या म्हणण्यानुसार, या अभ्यासक्रमातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेशासाठी अर्ज करताना 'पदवी युजीसी मान्यताप्राप्त नाही' या कारणावरून नोंदणी नाकारण्यात आली. याशिवाय नेट-सेट परीक्षा, सहाय्यक प्राध्यापक भरती, संशोधन शिष्यवृत्ती तसेच विविध शासकीय सेवांमध्येही ही पदवी ग्राह्य धरली जात नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांत या अभ्यासक्रमाची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक भविष्य अनिश्चिततेच्या छायेत गेल्याचे युवामंचाचे म्हणणे आहे.
 
- वारंवार पाठपुरावा, उत्तर मात्र तेच
 
 
राष्ट्रसंत तुकडोजी अभ्यास मंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी कुलगुरू, प्र-कुलगुरू, माजी कुलगुरू, विद्यमान कुलगुरू डॉ. मनाली क्षिरसागर तसेच नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याचे सांगितले. मात्र, 'प्रस्ताव प्रक्रियेत असून काही तांत्रिक अडचणी आहेत' या उत्तरापलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
- दुजाभावाचा आरोप
 
 
विद्यापीठात महात्मा गांधी विचारधारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा या अभ्यासक्रमांना युजीसीची मान्यता असून त्या विद्यार्थ्यांना नेट-सेट, शिष्यवृत्ती आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्याच विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने सुरू असलेल्या अभ्यासक्रमालाच मान्यता मिळत नसल्याने हा दुजाभाव असल्याचा आरोप युवामंचाने केला आहे.
- बोथे गुरुजींना जाहीर आवाहन
 
 
२८ जून रोजी विद्यापीठात आयोजित पद्मश्री पुरस्कारप्राप्त वैदर्भीय मान्यवरांच्या सत्कार समारंभात अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे महासचिव तथा पद्मश्री पुरस्कारप्राप्त जनार्दनजी बोथे यांचा सत्कार होणार आहे. या पार्श्वभूमीवर, "राष्ट्रसंतांच्या विचारधारेला न्याय मिळत नसेल, तर विद्यापीठाचा सत्कार स्वीकारू नये. अभ्यासक्रमाला युजीसीची मान्यता मिळेपर्यंत पद्मश्री पुरस्कार शासनाला परत करण्याची भूमिका घ्यावी," असे जाहीर आवाहन ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी केले आहे.
 
- प्रशासनासमोर अनुत्तरित प्रश्न
 
 
११ वर्षांनंतरही युजीसी मान्यतेचा प्रस्ताव का मार्गी लागला नाही? 'तांत्रिक अडचणी' नेमक्या कोणत्या आहेत? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही श्रीगुरूदेव युवामंचाने दिला आहे.