मुंबई,
Narvekar's clarification on condolence महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शोकप्रस्ताव वाचनादरम्यान झालेल्या चुकांमुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चर्चेत आले आहेत. दिवंगत गायिका अशा भोसले यांच्या संदर्भातील शोकप्रस्ताव वाचताना काही उच्चार आणि वाचनातील त्रुटी झाल्याने विरोधकांकडून आणि सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. मराठी भाषेबद्दल आपल्याला प्रचंड अभिमान असल्याचे सांगत, वाचनादरम्यान झालेल्या चुका अनावधानाने घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, त्यांना देण्यात आलेली प्रिंट स्पष्ट नव्हती आणि फॉन्टही लहान होता. त्यामुळे वाचन करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. शोकप्रस्तावाच्या मजकुरातही काही त्रुटी असल्याचे त्यांनी नमूद केले. याच कारणामुळे चुकीचे शब्द उच्चारले गेल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर सभागृहातील काही सदस्यांनी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. सभागृहाची प्रतिमा जपण्यासाठी अशा प्रकारच्या त्रुटी टाळल्या पाहिजेत, अशी भूमिका काही आमदारांनी मांडली. दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, राहुल नार्वेकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, अशा भोसले यांच्याबद्दल कोणताही अनादर व्यक्त करण्याचा प्रश्नच येत नाही. घडलेली घटना ही केवळ तांत्रिक चुकांमुळे झाली असून त्याचा गैरसमज करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.