यवतमाळ,
National Lok Adalat राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशांनुसार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
एकाच दिवशी जिल्ह्यातील सर्व स्तरांवरील न्यायालयांमध्ये लोकअदालतीचे आयोजन होत असल्याने प्रलंबित वाद जलदगतीने निकाली काढण्यास मोठी मदत होणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आनंद यावलकर यांच्या मार्गदर्शनात सकाळी 10.30 वाजता यवतमाळ जिल्हा न्यायालयात या लोकअदालतीचा शुभारंभ होणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार व औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच इतर न्यायाधिकरणांमध्येही एकाच वेळी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघ, यांचा संयुक्त सहभाग असून संपूर्ण न्यायव्यवस्थेचा समन्वय साधून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीत न्यायालयात प्रलंबित असलेली तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई प्रकरणे, भूसंपादन संबंधित वाद, महसूली प्रकरणे, वैवाहिक व कौटुंबिक वाद, बँका व वित्तीय संस्थांची कर्जवसुली प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश आहे.
प्रलंबित प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. दाखलपूर्व प्रकरणांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ किंवा संबंधित तालुका विधी सेवा समित्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष आनंद यावलकर, सचिव दीपक दाभाडे आणि जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन यांनी केले आहे.