बंगाली कॅम्प मच्छी मार्केटवर पोलिसांचा छापा

*600 किलो प्रतिबंधित थाई मांगुर मासे जप्त

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
चंद्रपूर, 
police-raid-bengali-camp-fish-market : रामनगर पोलिसांनी बंगाली कॅम्प मच्छी मार्केट परिसरात धाड टाकून केंद्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या थाई मांगुर जातीच्या माशांची मोठी खेप जप्त केली. या कारवाईत सुमारे 600 किलो मासे आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 7 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यंकटेशराव थिरपतीराव घंटासाला (रा. प्रथिकोल्लांका, जिल्हा ईलूरु, आंध्र प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.
 

CHAND 
 
 
 
22 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास रामनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कृष्णा दराडे व पोलिस हवालदार शरद कुडे हे हद्दीत गस्त घालत असताना त्यांना बंगाली कॅम्प मच्छी मार्केट येथे एका महिंद्रा बोलेरो पिकअपमधून प्रतिबंधित थाई मांगुर मासे विक्रीसाठी आणण्यात आल्याची माहिती मिळाली. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाड टाकून वाहनाची तपासणी केली. वाहनातील मासे ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या अधिकार्‍यांनी तपासणी करून हे मासे थाई मांगुर जातीचे असल्याची पुष्टी केली.
 
 
 
थाई मांगुर हा मासा पर्यावरण आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने घातक मानला जात असल्याने त्याच्या पैदास, वाहतूक व विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. या पृष्ठभूमीवर पोलिसांनी आरोपी व्यंकटेशराव थिरपतीराव घंटासाला याला ताब्यात घेतले.
 
 
 
आरोपीविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात कलम 223, 272, 275 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 च्या कलम 59 (आय) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान अंदाजे 60 हजार रुपये किंमतीचे 600 किलो थाई मांगुर मासे आणि 7 लाख रुपये किंमतीचे महिंद्रा बोलेरो वाहन जप्त करण्यात आले.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक उगले, पोलिस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, पोलिस हवालदार शरद कुडे, आनंद खरात, जितेंद्र आकरे, बाबा नैताम, प्रकाश मडावी तसेच रामनगर डीबी पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली.