प्रवीण बागडे यांना प्रतिष्ठेचा समाजभूषण पुरस्कार

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
नागपूर,
samajbhushan award पत्रकारिता, सामाजिक प्रबोधन, संविधानिक मूल्यांचा प्रचार-प्रसार तसेच वंचित, शोषित आणि बहुजन समाजाच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि सामाजिक विश्लेषक प्रवीण मोरेश्वर बागडे (नागपूर) यांची “राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार-२०२६” साठी निवड करण्यात आली आहे. आंबेडकरी विचारसरणीला वाहिलेल्या दैनिक निळे प्रतीकच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक, पत्रकारिता आणि समाजपरिवर्तनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते.
 
pravin bagde
 
हा पुरस्कार शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजता मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर, टी.व्ही. सेंटर, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. दैनिक निळे प्रतीकचे मुख्य संपादक तथा निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आयु. रतनकुमार साळवे यांनी ही निवड जाहीर केली. पत्रकारिता, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्यांचे संवर्धन आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याच्या कार्याची दखल घेऊन प्रवीण बागडे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रवीण बागडे यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक प्रश्नांवर निर्भीडपणे लेखन करत समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता तसेच आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांनी समाधान व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे.
सौजन्य: प्रवीण बागडे, संपर्क मित्र