इराण मुद्द्यावरून ट्रम्प यांच्या खासदारांची बंडखोरी

    दिनांक :24-Jun-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Rebellion by Trump's lawmakers अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणविरोधातील धोरणावर मोठा राजकीय धक्का बसला आहे. अमेरिकन संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने इराणविरोधातील लष्करी कारवाई थांबवण्यासंदर्भातील महत्त्वाचा ठराव मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्या स्वतःच्या रिपब्लिकन पक्षातील काही खासदारांनीही या ठरावाच्या बाजूने मतदान करत पक्षांतर्गत मतभेद स्पष्ट केले. सिनेटमध्ये या ठरावाला ५० मते समर्थनार्थ मिळाली, तर ४८ सदस्यांनी विरोधात मतदान केले. या मतदानामुळे ट्रम्प प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इराणविरोधातील कारवाईवरून रिपब्लिकन पक्षातही दोन गट पडल्याचे स्पष्ट दिसून आले.
 
 
 
tri m
 
हा ठराव ‘वॉर पॉवर्स ॲक्ट’ अंतर्गत मांडण्यात आला असून, अध्यक्षांच्या युद्धविषयक अधिकारांवर नियंत्रण ठेवण्याचा उद्देश आहे. अमेरिकन काँग्रेसने अध्यक्षांना लष्करी हालचालींबाबत मर्यादा घालण्याचा प्रयत्न केल्याने या निर्णयाला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.रिपब्लिकन पक्षाकडे दोन्ही सभागृहांमध्ये अल्प बहुमत असतानाही काही सदस्यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेविरोधात मतदान केले. त्यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. याचवेळी काही डेमोक्रॅट सदस्यांनीही वेगळी भूमिका घेतल्याने मतदानाचे चित्र अधिकच रंजक ठरले.
 
 
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या तणाव कायम असला तरी शांतता करारासाठी चर्चाही सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संसदेच्या या निर्णयाचा पुढील वाटाघाटींवर काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. व्हाईट हाऊसने मात्र या ठरावाला असंवैधानिक असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर पुढे कायदेशीर संघर्षही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतील राजकीय समीकरणांमध्ये या घडामोडीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.