अचलपूर,
paratwada-dharni-route : मंगळवारी रात्री अचलपूर तालुक्यात मुसळधार पाऊस आला. बुधवारी परतवाडा - धारणी मार्गावर मल्हार गावानजीक अनेक वर्ष जुने असलेले वडाचे भले मोठे झाड रस्त्यावर पडल्याने परतवाडा - धारणी मार्ग जवळपास तीन ते चार तास पूर्णतः बंद झाला होता. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुदैवाने या दरम्यान कुठलेच वाहन यात अडकले नाही.
तालुक्यातील मल्हारा गावा नजीक परतवाडा - धारणी मार्गावर एका धाब्याजवळ भले मोठे पुरातन असलेले वडाचे झाड बुधवार सकाळच्या दरम्यान जमिनीपासून कोलमडले. त्यामुळे धारणी, इंदोर, खंडवा, बर्हाणपुरवरून अमरावती व परतवाडा कडे येणारी व जाणार्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हा अत्यंत वर्दळीचा महामार्ग असल्यामुळे या मार्गावर अनेक खानावळी, धाबे आहेत. त्यामुळे अनेक लहान, मोठी वाहने देखील झाडाखाली उभी केली जातात. सुदैवाने सकाळची वेळ असल्यामुळे त्या भागात कुठलेही वाहन उभे नव्हते होते. अमरावती - खंडवा महामार्गावर मल्हारा ते गौरखेडा कुंभी या दोन गावा दरम्यान वडाची फार जुनी झाडे आहेत. अनेकांच्या मोठ्या फांद्या, तुरंबे, रस्त्यावर लटकली आहेत. पुढे असा अपघात किंवा कुठल्याही अनर्थ होऊ नये याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन या रस्त्यावर आलेल्या फाद्या छाटाव्या तसेच या पुरातन वृक्षांचे संवर्धन करण्याकरिता त्याला संरक्षक कठडे बांधावी. योग्य ते पावले उचलावी अशी मागणी जनतेतून होत आहे.